जलयुक्त शिवारात ठाणे आघाडीवर

By admin | Published: September 30, 2016 02:36 AM2016-09-30T02:36:48+5:302016-09-30T02:36:48+5:30

जलयुक्त शिवार योजना कोकणातील २०३ गावांमध्ये सुरू आहे. यातील १५० गावांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ५३ गावांची कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होणार आहेत. ठाणे जिल्ह्यात

Thane is in the water tank | जलयुक्त शिवारात ठाणे आघाडीवर

जलयुक्त शिवारात ठाणे आघाडीवर

Next

ठाणे : जलयुक्त शिवार योजना कोकणातील २०३ गावांमध्ये सुरू आहे. यातील १५० गावांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ५३ गावांची कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होणार आहेत. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक एक हजार ८८५ वनराई बंधारे झाले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोकण विभागातील ठाणे, पालघर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी योजनांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ठाण्यात आढावा घेतला.
विभागात वनराई बंधाऱ्यांचे काम उत्तम झाले आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक एक हजार ८८५ बंधारे झाले आहेत. या बंधाऱ्यांमुळे पाच जिल्ह्यांमधील १७ हजार ४४२ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.कोकणातील ५० हजार हेक्टर पडीक जमिनीवर नरेगाची कामे घेतली जाणार आहेत. त्यासाठी एक हजार कोटी रुपये खर्च करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आंबालागवडीसाठी पाच बाय पाच ही नवीन अट लागू केली आहे. यानुसार, आंबापीक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख ८१ हजार रुपयांचे अनुदान नरेगाद्वारे दिले जाणार आहे. मागेल त्या शेतकऱ्यास शेततळ्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या ‘ठाणे सहज’ या मोबाइल अ‍ॅपचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा वगळताठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, सिंधुदुर्गचे दीपक केसरकर, रत्नागिरीचे रवींद्र वायकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मार्चअखेरपर्यंत कोकण हगणदारीमुक्त - स्वच्छ भारत मिशनमध्ये महाराष्ट्राचा दहावा क्रमांक आला आहे. कोकणातील ६४ टक्के ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या आहेत. उर्वरित ३३ टक्के ग्रा.पं. २०१७ पर्यंत हगणदारीमुक्त करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. राज्यात ६२ टक्के कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये आहेत. यात कोकण विभागात सरासरी ८३ टक्के कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये आहेत, असे त्यांनी सांगितले
सेवा हमी कायदा - यामध्ये १३ सेवा देण्याची कामे दिली आहे. यासाठी पाच जिल्ह्यांमधून चार लाख ४४ हजार ८५० अर्ज दाखल झाले. त्यातील चार लाख ४४ हजार ८०५ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित ८२ अर्जदार प्रथम सुनावणीस गेले. त्यावर, निर्णय झाला असून फक्त द्वितीय सुनावणीत चार अर्ज शिल्लक असल्याचे नमूद केले. (प्रतिनिधी)

सिंचन विहिरी
कोकणात ६ हजार १२३ सिंचन विहिरींची कामे हाती घेतली आहेत. त्यातील ३ हजार ३३७ विहिरी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित २ हजार २९० डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहेत.

कृषिपंपांची जोडणी
विभागात ५ हजार ८४५ कृषिपंपांची कामे हाती घेतली आहेत. यातील १ हजार ९१० पंपांना आतापर्यंत वीजजोडण्या दिल्या आहेत. उर्वरित ३ हजार ९३५ जोडण्या शिल्लक आहेत.

आवास योजना
विभागात प्रधानमंत्री आवास योजनेच्या १३ हजार ९९७ घरांपैकी १२ हजार ७६० घरांसाठी पहिल्या हप्त्याचे अनुदान देण्यात आले आहे. दुसरा हप्ता लवकरच ४हजार ५३८ घरांसाठी देण्याचे नियोजन केले आहे. डिसेंबरपर्यंत ९० टक्के, तर मार्चपर्यत उर्वरित १० टक्के घरांचे काम पूर्ण होणार आहे. रमाई आवास योजनेद्वारे ३ हजार ७३५ घरांची कामे हाती घेतली आहेत.

Web Title: Thane is in the water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.