सचिन तेंडुलकरमुळे ठाणेकरांना होणार 'कर्तव्य'ची जाणीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2016 11:16 PM2016-08-11T23:16:09+5:302016-08-11T23:16:09+5:30
नागरी समुदायाच्या संयुक्त प्रयत्नांनी कर्तव्य हा अभिनव जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहे.
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 11 - शहरातील जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांचे हक्क, त्यांना सन्मानाने वागणूक मिळण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालय आणि नागरी समुदायाच्या संयुक्त प्रयत्नांनी कर्तव्य हा अभिनव जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या पुढाकाराने साकार होणा-या या उपक्रमाचे येत्या 15 ऑगस्ट रोजी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती ठाण्याचे सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली.
या उपक्रमासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त, पोलीस निरीक्षक आणि सामाजिक संस्थेचे एक पॅनल स्थापण्यात आले आहे. या समितीची प्रत्येक महिन्याला बैठक होणार असून त्यामध्ये ज्येष्ठांच्या बाबतीतला आढावा घेण्यात येणार असल्याचे कर्नल रावत यांनी सांगितले. बाहेर गावी किंवा परदेशात मुले जातात. काही मुले नोकरीनिमित्त बाहेर असतात तर नातवंडे शिक्षणानिमित्त बाहेर असतात. अशावेळी घरातील ज्येष्ठ मंडळी मात्र एकदम एकाकी पडतात. त्यातून त्यांच्या सुरक्षेचा तर कधी मानसिक खच्चीकरणाचा तर कधी आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो. यातून ब-याचदा जीवित, शारीरिक आणि आर्थिक हानी आणि काही प्रसंगी होणारा मानसिक छळ तसेच मानहानी आदी घटनांची जाणीव समाजाला समाजामार्फतच करून देणारा हा अनोखा कर्तव्य उपक्रम असल्याचे डुंबरे यांनी सांगितले. ठाणे शहरापासून सुरु होणारा हा उपक्रम इतर परिमंडळांमध्येही टप्प्याटप्प्याने राबविला जाणार आहे. पहिल्या स्तरावर शहरातील जेष्ठ नागरिकांसंबंधिची माहिती संकलित केली जाणार आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या मार्गदर्शनाने संदर्भ प्रश्नावली तयार केली आहे. ही माहिती जेष्ठ नागरिकांकडून तसेच गृहनिर्माण संस्था आणि वसाहतींच्या कार्यालयांमार्फत संकलीत केली जाणार आहे. जेंष्ठांप्रती असलेली सामाजिक जबाबदारी आणि त्यांना अपेक्षित सहकार्य या विषयांबद्दलची जनजागृती विविध युवक मंडळे तसेच खासगी संस्था कर्तव्य उपक्रमांतर्गत करणार आहेत. जेष्ठांना वेळीच जेवण न देणो, त्यांना औषधांपासून वंचित ठेवणो, त्यांना घरामध्ये कोंडून ठेवणे, अशी काही अप्रकटीत गुन्हयाचे प्रकारही घडत असल्यामुळे असा उपक्रम राबविण्यात येत आहे.
मोफत टोल फ्री क्रमांक
कर्तव्य उपक्रमासाठी ठाणे शहर पोलिसांतर्फे 1090 हा विशेष टोल फ्री दूरध्वनी क्रमांक उपलब्ध केला जाणार आहे. त्यावर नागरिकांना आपल्या आजूबाजूला घडणा-या जेष्ठांसंबंधीच्या गुन्हयाची माहिती देता येणार आहे. अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडूनही त्यावर तत्परतेने कारवाई केली जाणार असल्यामुळे एखादी अप्रिय घटना टाळता येणार आहे.
जेष्ठांनी पुढील पिढीला दिलेला शिक्षणाचा, संस्कृतीचा वारसा त्यांच्याकडून मिळणारी उत्तम जीवनमूल्यांची शिकवण या सर्व बाबींसाठी प्रत्येकाने त्यांचे सदैव ऋणी रहावे आणि त्यांच्या प्रती सौजन्य बाळगावे. या जाणीवेची जनजागृती करणो हाच कर्तव्य उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.