रेल्वेच्या डी धरणाचे पाणी आता ठाण्यालाही मिळणार

By admin | Published: April 23, 2016 06:21 PM2016-04-23T18:21:50+5:302016-04-23T18:23:44+5:30

नवी मुंबईच्या हद्दीत असलेल्या रेल्वेच्या डी धरणाचे पाणी आता नवी मुंबईबरोबरच ठाण्यालाही मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे

Thane will get the water from the railway de-dam | रेल्वेच्या डी धरणाचे पाणी आता ठाण्यालाही मिळणार

रेल्वेच्या डी धरणाचे पाणी आता ठाण्यालाही मिळणार

Next
ठाणे, दि. २३ - नवी मुंबईच्या हद्दीत असलेल्या रेल्वेच्या डी धरणाचे पाणी आता नवी मुंबईबरोबरच ठाण्यालाही मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यासंदर्भात ट्विट केल्यानंतर या धरणाची पाहणी रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि ठाणे महापालिका आयुक्त सोमवारी करणार आहेत. 
 
कळवा- मुंब्य्रातील नागरिकांना सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एमआयडीसीची पाणीकपात 60 तासांची झाल्याने सलग तीन दिवस येथील रहिवाशांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी मागील कित्येक वर्षापासून कळवा आणि रबाळेच्या दरम्यान पारसिक पुलाच्या मागे बंद असलेले रेल्वेचे डी धरण उपयोगात आणण्याबाबत ठाणे महापालिका आणि रेल्वे विभागाकडे मागणी करण्यात येत होती. यासाठी दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिकेकडे पत्रव्यवहारदेखील केला होता. तसेच ठाणे शहर मनसेचे प्रदीप सावर्डेकर यांनीदेखील पालिका आणि रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. परंतु, काही दिवसांपूर्वी या धरणाचे पाणी नवी मुंबईला वळवण्यात मोलाचा वाटा उचलणारे खासदार राजन विचारे यांचा राष्ट्रवादी आणि मनसेने निषेध केला. त्यामुळे त्याच्या पाण्यावरून ठाण्यातील राजकीय वातावरणही ढवळून निघाले होते. 
 
तर, तिकडे नवी मुंबईला त्याचे पाणी मिळावे, यासाठी आधी तत्कालीन खासदार संजीव नाईक आणि आता राजन विचारे यांनी पाठपुरावा केला. विचारेंच्या पाठपुराव्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नवी मुंबईसाठी पाणी उचलण्यास गेल्या पंधरवडय़ात हिरवा कंदील दिल्यानंतर नवी मुंबई महापालिकेने धरणातून पाणी शहरात आणण्यासाठी जलवाहिन्या टाकण्यासह तत्सम कामांच्या निविदा प्रक्रियाही सुरू केल्या आहेत.
 
मात्र, आता पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ठाणेकरांची वाढती मागणी लक्षात घेता प्रभूंनी या धरणाचे पाणी नवी मुंबईसह ठाण्याला देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
* आजघडीला या धरणाची क्षमता 4 दशलक्षलीटरची असून त्याची दुरुस्ती केल्यास ते  सुमारे 12 ते 15 दशलक्षलीटर क्षमतेचे शकणार आहे. त्याच्या जमिनीचा मालकी हक्क रेल्वेकडे असून ते मुंब्य्राच्या डोंगराच्या मागे रबाळे आणि पारसिकच्या मध्ये आहे. त्याची सध्याची स्थिती जरी व्यवस्थित नसली तरी त्याची पुनर्बाधणी करून त्या धरणाचा वापर केला जाऊ शकतो. त्याला डी धरण म्हणून संबोधले जाते.
 
* इंग्रजांच्या काळात जेव्हा रेल्वे ट्रॅक हा ठाण्याच्या पुढे न्यायचा होता, त्या वेळी येथे डोंगर पोखरून दोन मोठे बोगदे तयार करण्याचे काम करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात बाहेरून मजूर आणले गेले होते. या मजुरांच्या निवा-याची व्यवस्था या डोंगरावर केली होती. परंतु, त्यांच्या पाण्याचा प्रश्न कायम होता, तेव्हा त्यांच्याकरिता रेल्वेने हे डी धरण बांधले. त्याच्या तीनही बाजूंनी डोंगर असून जाण्यासाठी एक रस्ता आहे. परिणामी, तिन्ही डोंगरांवरून पावसाळ्यात वाहत येणारे पाणी या धरणात साठवले जाते. त्याचा वापर वर्षभर केला जाऊ शकतो.
 
दरम्यान, आता या धरणातील अर्धे पाणी नवी मुंबईला आणि अर्धे ठाण्यालाही मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलेल्या सूचनेनंतर आता सोमवारी या धरणाची संयुक्त पाहणी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस.के. सूद आणि ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल करणार आहेत. यास आयुक्तांनी दुजोरा दिला आहे. पाहणी केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
अंबरनाथ येथेही रेल्वेच्या मालकीचे आणखी एक धरण आहे. ते जीआयपी टँक (गेट्र इंडियन पेनिनसुला) या तत्कालीन रेल्वे कंपनीच्या नावाने ओळखले जाते. त्याची क्षमता 6 एमएलडी इतकी आहे. सध्या त्याच्या पाण्यावर रेल नीर हा रेल्वेचा मिनरल वॉटरचा प्रकल्प सुरू आहे.
 

Web Title: Thane will get the water from the railway de-dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.