ठाण्यातून महिलेला 150 किलो गांजासह अटक
By admin | Published: August 7, 2016 07:31 PM2016-08-07T19:31:24+5:302016-08-07T19:31:24+5:30
महिलेला 150 किलो गांजासह ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी कळव्याच्या विटावा भागातून अटक केली.
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 7- मुंबई, ठाणे आणि मुंब्रा भागात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या कनिसा फारुख सरदार उर्फ खैरुल (35, रा. मुंब्रा) या महिलेला 150 किलो गांजासह ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी कळव्याच्या विटावा भागातून अटक केली. इतक्या मोठया प्रमाणात गांजा हस्तगत करण्याची ही पहिलीच तर अंमली पदार्थ हस्तगत करण्याची ठाणे पोलिसांची ही दुसरी कारवाई असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 22 लाखांचा गांजा आणि कार असा 30 लाखांचा ऐवज पोलिसांनी तिच्याकडून हस्तगत केला आहे.
हैदराबाद येथून एका कारमधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अमोल वालझडे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे खैरुल हिच्यावर गेल्या 15 दिवसांपासून पोलिसांनी पाळत ठेवली होती. ती शनिवारी ठाण्यात 'माल' घेऊन येणार असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त परमवीरसिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम शेळके यांच्या मार्गदशनाखाली विटावा भागात पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय घोसाळकर, उपनिरीक्षक विजय उपाळे, विठ्ठल करंजुले, चंद्रकात घाडगे आणि वालझाडे आदींच्या पथकाने सापळा लावून तिला 6 ऑगस्ट रोजी रात्री 8 वा. च्या सुमारास अटक केली. ही कारवाई रविवारी पहाटे 5 वा. र्पयत सुरु होती. ठाणे न्यायालयाने तिला 9 ऑगस्टर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
................
हैदराबाद कनेक्शन
हैदराबाद येथील अण्णा आणि छोटू या दोघांकडून आणलेला गांजा ती मुंबईतील मालाड, मीरा रोड, ठाण्याच्या मुंब्रा, घोडबंदर रोड आणि गुजरातच्या काही भागांमध्ये विक्री करणार होती. यापूर्वीही गांजा प्रकरणात 2015 मध्ये ठाणे पोलिसांनी तिच्यासह तिच्या मेव्हण्यालाही (बहिणीचा पती) अटक केली होती. मात्र, तिच्याकडे त्यावेळी काहीच अमली पदार्थ न मिळाल्याने तिची जामीनावर सुटका झाली होती. जामीनावर सुटका झाल्यानंतर तिने पुन्हा हाच 'उद्योग' सुरु केला. हैदराबाद येथील गांजाची मुख्य तस्कर आण्णाच्या ती संपर्कात होती. त्याच्याच सांगण्यावरुन ती हे काम करीत होती. यात आणखी कोण कोण सहभागी आहे, याचा सर्व तपास आता सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.