ठाणेकरांना आता पाहता येणार मोबाइलवर हवेची गुणवत्ता

By admin | Published: June 6, 2017 04:11 AM2017-06-06T04:11:30+5:302017-06-06T04:11:30+5:30

ठाणे महापालिकेने तयार केलेल्या मोबाइल अ‍ॅपचे लोकार्पण महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

Thanekar can see the quality of air on mobile now | ठाणेकरांना आता पाहता येणार मोबाइलवर हवेची गुणवत्ता

ठाणेकरांना आता पाहता येणार मोबाइलवर हवेची गुणवत्ता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : नागरिकांना शहरातील हवेची गुणवत्ता कशी आणि किती आहे, हे तपासण्यासाठी डीआरपी ग्लोबल टेक्नॉलॉजी यांच्या माध्यमातून ठाणे महापालिकेने तयार केलेल्या मोबाइल अ‍ॅपचे लोकार्पण महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापनाकरिता पालिकेने सुरू केलेल्या विविध प्रकल्पांच्या लघुचित्रफितीचे उद्घाटनही या वेळी करण्यात आले. याप्रसंगी विविध प्रकल्पांच्या उभारणीकरिता सहकार्य लाभलेले पीपीपी भागीदार, ठाणे शहरातील कचरावेचक, ठाणे शहरातील विविध मंदिरांचे प्रतिनिधी व गृहसंकुले/गृहसंस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार महापौर व आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला.
ठाणे महानगरपालिका व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सहकार्याने सोमवारी जागतिक पर्यावरण दिनाचा कार्यक्रम कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात साजरा करण्यात आला. या वेळी पालिकेद्वारे सुरू करण्यात आलेल्या विविध घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांची माहिती व घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्याकरिता समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सहकार्याने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक लघुचित्रफीत तयार केली आहे. ती नागरिकांकरिता सोशल मीडियावरूनदेखील प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पालिका क्षेत्रात एकूण २५० सोसायट्यांनी ओला व सुका कचरा वर्गीकरणात सहभाग घेतलेला असून त्यातील प्रातिनिधिक २५ सोसायट्यांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात महापौर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रकल्पांचे कौतुक केले. घनकचरा व्यवस्थापनासह मलनि:सारण प्रकल्पात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे त्यांचेही आरोग्य राखले जाईल.
>फुलपाखरू उद्यान येथे वृक्षारोपण : विविध प्रजातींची ५० फुलपाखरे
ठाणे महानगरपालिकेतर्फे प्रमोद महाजन निसर्ग उद्यान येथील फुलपाखरू उद्यानामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. एकूण ५० स्वदेशी प्रजातींची आणि ५० विविध सुगंधाच्या फुलझाडांची व फळांची झाडे लावण्यात येणार आहेत. सदर फुलपाखरू उद्यानात ५० विविध प्रजातींची फुलपाखरे बघण्यास मिळणार आहेत.
मोबाइल अ‍ॅप लोकार्पण : गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध
वाढत्या नागरिकीकरणामुळे आणि वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे हवा प्रदूषणात वाढ होत आहे. त्याबाबत प्रशासनातर्फेविविध उपक्र म हवा प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी आखण्यात येत आहेत. उदा. रस्ता रु ंदीकरण, फ्लायओव्हर उभारणे, वृक्षलागवड करणे. परंतु, नागरिकांनी स्वत: उपाययोजना करणे गरजेचे आहे.
जशी नियमितपणे वाहनांची पीयूसीतपासणी करून घेणे, स्वच्छ इंधनाची वाहने वापरणे, सिग्नलवर वाहनांचे इंजीन बंद ठेवणे यादृष्टीने जनजागृतीसाठी डीआरपी ग्लोबल टेक्नॉलॉजीस यांच्या माध्यमातून एअर क्वॉलिटी अ‍ॅप तयार केले आहे.
गुगल प्ले स्टोअरवरून नागरिकांना ते डाउनलोड करता येईल. महानगरपालिका शहरात चार ठिकाणी हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप करत असते. उदा. रहिवासी, व्यापारी, औद्योगिक क्षेत्र व चौक यांचा सरासरी अहवाल आपल्याला या अ‍ॅपवर दिसेल.
यामध्ये प्रत्येक क्षेत्राची हवा सर्वेक्षण माहितीसुद्धा प्राप्त होईल. त्याबाबत नकाशेही बघायला मिळतील. तसेच नागरिकांना ठामपाच्या पर्यावरणस्नेही उपक्र मात भाग घ्यायचा असल्यास त्यांना त्याबाबत नोंदणीही करता येईल. या वेळी उपमहापौर रमाकांत मढवी, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब, नगरसेवक विकास रेपाळे, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान आदी उपस्थित होते.

Web Title: Thanekar can see the quality of air on mobile now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.