ठाणेकरांवर बोजा मालमत्ताकरवाढीचा
By admin | Published: March 31, 2017 04:01 AM2017-03-31T04:01:20+5:302017-03-31T04:01:20+5:30
महापालिका निवडणुकीत ५०० चौ.फू. क्षेत्रफळाच्या मालमत्ताधारकांना करमाफीची घोषणा करणाऱ्या शिवसेनेने आपल्या
ठाणे : महापालिका निवडणुकीत ५०० चौ.फू. क्षेत्रफळाच्या मालमत्ताधारकांना करमाफीची घोषणा करणाऱ्या शिवसेनेने आपल्या घोषणेपासून घूमजाव करीत मालमत्ताकरात १० टक्के वाढ प्रस्तावित केली. यामुळे ठाणेकरांवर सुमारे ८० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ९०० कोटींची वाढ दर्शवणारा ३ हजार ३९० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी महासभेसमोर सादर केला. मालमत्ताकरात वाढ प्रस्तावित करताना अनेक विकासकामे करण्याची हमी आयुक्तांनी दिली आहे.
२०१७-१८ च्या जमाखर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक महासभेसमोर सादर करताना आयुक्त जयस्वाल यांनी विकासाबाबतचे त्यांचे धोरण स्पष्ट केले. अर्थसंकल्प ३३९०.७८ कोटी रुपयांचा असून त्यामध्ये महापालिकेचे उत्पन्न २३३३.९२ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहे. अनुदाने २३२.८६ कोटी रुपये, तर कर्ज, कर्जरोख्यांपासून ५३५ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. आरंभीची शिल्लक २८९ कोटी रुपये असून महसुली खर्च १५६२.८२ कोटी रुपये, तर भांडवली खर्च १८२७.७२ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आला आहे. २४ लाख रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प गतवर्षीच्या तुलनेत ९०७.५७ कोटींनी जास्त आहे. मालमत्ताकरांमध्ये १० टककयांची वाढ प्रस्तावित करताना, वर्षभराचा कर ३१ मेपूर्वी एकरकमी भरणाऱ्या ठाणेकरांना सामान्य करात १० टक्के सूट देऊ केली आहे. (प्रतिनिधी)