मधुर, रसाळ हापूस आला ठाणेकरांच्या आवाक्यात!
By admin | Published: April 26, 2016 03:43 AM2016-04-26T03:43:05+5:302016-04-26T03:43:05+5:30
हंगाम सुरू होताच मार्चमध्ये दरांच्या बाबतीतही आपले राजेपण जपणाऱ्या आंब्याने आता मात्र आवक वाढू लागल्यावर हळूहळू का होईना पण सामान्यांच्या खिशाला परवडेल असा दराचा पल्ला गाठला आहे.
ठाणे : हंगाम सुरू होताच मार्चमध्ये दरांच्या बाबतीतही आपले राजेपण जपणाऱ्या आंब्याने आता मात्र आवक वाढू लागल्यावर हळूहळू का होईना पण सामान्यांच्या खिशाला परवडेल असा दराचा पल्ला गाठला आहे. आंब्यांचा आकार, दर्जा यानुसार सध्या हापूसचे दरही ३०० ते ४०० रूपयांपासून सुरू होत असल्याने त्यांचा घमघमाट आता मध्यमवर्गीयांच्याही आवाक्यात आला आहे.
पाडव्याच्या अगोदर माफक आवक असलेल्या आंब्याने आपला आब कायम ठेवत डझनाला १६०० रूपयांपर्यंतचा भाव मिळवला होता. एप्रिलच्या अखेरीपासून आवक वाढत गेली, तसतसा दरही हळूहळू उतरत गेला आणि देवगड-रत्नागिराच्या हापूसपासून वेगवेगळ््या ठिकाणचा आंबा आपला आकार, दर्जा यानुसार आवाक्यात आला.
मार्चमध्ये असलेले आंब्याचे दर पाहता सर्वसामान्य ठाणेकर खरेदीकडे फिरकतच नव्हते. मात्र, आता दर हळूहळू कमी होत असल्याने आंब्याच्या खरेदीकडे खवय्यांची पावले वळू लागली आहेत. ठाण्याच्या बाजारपेठेत ३०० रूपयांपासून पार हजार रूपयांपर्यंत आंबे मिळत आहेत. देवगड, रत्नागिरीच्या आंब्याचे दर साधारण सारखेच असून सर्वात लहान आंब्याचे दर ३०० च्या घरात आहेत. काही विक्रेते रायवळ आंब्याचीही विक्री करताना दिसत आहेत. (प्रतिनिधी)