ठाणेकरांचे शानदार विजेतेपद
By admin | Published: October 18, 2016 04:14 AM2016-10-18T04:14:21+5:302016-10-18T04:14:21+5:30
मुंबई उपनगरचे तगडे आव्हान परतावून ४४व्या ज्यूनियर राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो - खो स्पर्धेत कुमार गटाचे विजेतेपद पटकावले.
मुंबई : अलाहिदा डावापर्यंत रंगलेल्या अत्यंत थरारक सामन्यात अवघा एक गुण आणि १० सेकंदांनी बाजी मारत गतविजेत्या ठाण्याने बलाढ्य मुंबई उपनगरचे तगडे आव्हान परतावून ४४व्या ज्यूनियर राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो - खो स्पर्धेत कुमार गटाचे विजेतेपद पटकावले. त्याचवेळी मुलींच्या गटात पुणेकरांनी संभाव्य विजेत्या ठाणेकरांना धक्का देत बाजी मारली.
महाराष्ट्र खो - खो संघटना व अहमदनगर जिल्हा खो - खो संघटना यांच्या मान्यतेने शेवगाव येथे झालेल्या या स्पर्धेतील कुमार गटाचा अंतिम सामना चांगलाच चुरशीचा रंगला. निर्धारीत वेळेत ठाणे व मुंबई उपनगरने दोन्ही डावांत ५-५, ५-५ अशी बरोबरी साधल्याने सामना अलाहिदा डावात खेळविण्याचा निर्णय झाला. यावेळी मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना ठाणेकरांनी अवघ्या एका गुणाने ६-५ अशी निर्णायक बाजी मारुन मुंबई उपनगरला धक्का दिला. जीतेश म्हसकर, आकाश तोरणे यांनी अष्टपैलू खेळ करताना ठाण्याचे जेतेपद साकरले. तर मुंबई उपनगरकडून आशिष बने, निहार दुबळे आणि ओमकार सोनावणे यांचा कडवा प्रतिकार अपयशी ठरला.
दुसरीकडे, मुलींच्या गटात पुणेकरांनी चमकदार खेळ करताना बलाढ्य ठाण्याचे तगडे आव्हान ४-४, ५-४ असा एका गुणाने आणि १ मिनिट राखून परतावले. मध्यंतराला दोन्ही संघांनी बरोबरी साधल्यानंतर पुणेकरांनी आक्रमक खेळ करताना एका गुणाची कमाई करुन विजेतेपदावर नाव कोरले. श्रेया आडकरच्या अष्टपैलू खेळासह सपना जाधव, प्रणाली बेनके आणि कोमल दारवटकर यांचे दमदार संरक्षण पुण्याच्या विजेतेपदामध्ये निर्णायक ठरले. तर, ठाण्याकडून रेश्मा राठोड, रुपाली बडे, गुलाब म्हसकर आणि तेजश्री कोंढाळकर यांची झुंज अपयशी ठरली. (क्रीडा प्रतिनिधी)
>वैयक्तिक विजेते :
सर्वोत्कृष्ट संरक्षक :
कुमार : आकाश तोरणे (ठाणे)
मुली : रेश्मा राठोड (ठाणे)
सर्वोत्कृष्ट आक्रमक :
कुमार : शुभम उत्तेकर (ठाणे)
मुली : श्रेया आडकर (पुणे)
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू :
कुमार : निहार दुबळे (मुंबई उपनगर)
मुली : कोमल दारवटकर (पुणे)