दारी आलेल्या भाजीला ठाणेकरांचा तुडुंब प्रतिसाद
By admin | Published: August 4, 2016 02:50 AM2016-08-04T02:50:54+5:302016-08-04T02:50:54+5:30
‘शॉप फॉर चेंज’ या संस्थेने ठाण्यात आयोजित केलेल्या शेतकरी ते ग्राहक उपक्रमास ठाणेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला.
ठाणे : ग्राहकांना थेट दारापर्यंत भाजीपाला मिळावा यासाठी ‘शॉप फॉर चेंज’ या संस्थेने ठाण्यात आयोजित केलेल्या शेतकरी ते ग्राहक उपक्रमास ठाणेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांचा माल थेट आपल्या दारापर्यंत मिळत असल्याने एकीकडे ठाणेकर आनंदीत झाले होते, तर आपल्या शेतातील भाजीपाला हातोहात विकला जात असल्याने शेतकरीही सुखावले होते.
ठाणे, डोंबिवली, दादर येथे प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात आला. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता ठाण्यातील विष्णूनगर येथे बुधवारी मनसेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला गेला. नारायणगाव परिसरातील शेतकऱ्यांचा चांगल्या दर्जाचा रास्त दरातील भाजीपाला ठाणेकरांच्या दारात आला. जवळपास दीड टन भाजीपाला आणला होता. आता दर सोमवारी, बुधवारी आणि शनिवारी ४.३० ते ७.३० यावेळेत दादर, डोंबिवली, ठाणे येथे हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे संस्थेचे समीर आठवले यांनी सांगितले.
दलालांच्या माध्यमातून ज्यावेळी भाजीपाला विकला जात असे त्यावेळी आम्हाला तुटपुंजी मिळकत मिळत होती. परंतु या उपक्रमामुळे ३० टक्के फायदा होतो. आमच्या शेतातील माल थेट ग्राहकाच्या दारात जातो, ही संकल्पनाच खूप समाधान देणारी आहे. आम्ही थेट शहरात विक्रीसाठी आलो तर आम्हाला कोण दाद देणार? त्यामुळे संस्थेचा मोलाचा आधार मिळतो आहे.
हा उपक्रम सातत्याने चालू रहावा, अशी आमची अपेक्षा आहे. ग्राहकांना ज्या भाज्या आवडतात त्याच आम्ही आणतो. कोणीही घासाघीस करीत नाही. कारण किरकोळ बाजारातून घेत असलेल्या दरापेक्षा ५० टक्के कमी दरानेच भाजीपाला आम्ही विकतो. त्यामुळे यात ग्राहकांचाच फायदा आहे. भाजीपाला विकताना कोणतीही अडचण आम्हाला जाणवत नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
याआधी ठाण्यात प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम राबविला होता. त्यावेळी जवळपास ८०० किलो भाजीपाला विकला गेला होता. परंतु आताही ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. - समीर आठवले, शॉप फॉर चेंज.