यूआयपीएम स्पर्धेत ठाण्याच्या खेडाळूंची मोहोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2016 05:58 PM2016-11-03T17:58:23+5:302016-11-03T17:58:23+5:30
जागतिक अजिंक्यपद स्पर्धा - सारासोता, फ्लोरिडा (यूएसए) येथे ठाण्याच्या दोन खेळाडूंनी सुवर्ण पदके पटकावून मॉडर्न पेंटेथलॉन ह्या खेळांत आंतरराष्ट्रीय नकाशावर
Next
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 03 - जागतिक अजिंक्यपद स्पर्धा - सारासोता, फ्लोरिडा (यूएसए) येथे ठाण्याच्या दोन खेळाडूंनी सुवर्ण पदके पटकावून मॉडर्न पेंटेथलॉन ह्या खेळांत आंतरराष्ट्रीय नकाशावर ठाण्याचीच नव्हे तर भारताची छाप सोडली आहे. सवर अकुस्कर आणि वेदांत गोखले, ह्या स्टारफिश स्पोर्ट्स अकॅडेमिच्या खेळाडूंनी biathle ओपन शर्यतीत 11 वर्षे वयोगटाखालील पर्यंत मुली व मुले वर्गात सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.
२ नोव्हेंबर २०१६ रोजी, यांनी आयोजित केलेल्या विशेष समारंभात सर्व सहभागी खेळाडू - सवर अकुस्कर, वेदांत गोखले, मयांक चाफेकर, कौस्तुभ मलबारी, जय एकबोटे, यश पावशे, मयुरेश धावडे आणि किमया काजरोळकर, तसेच त्यांचे प्रशिक्षक कैलास आखाडे आणि नरेंद्र पवार यांचा माननीय आयुक्त, ठाणे महानगरपालिका श्री संजीव जयस्वाल, यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी युवा आयकॉन, सुपरमॉडेल, अभिनेता व Triathlon Ironman - मिलिंद सोमण, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका श्री अशोककुमार रणखांब, उपायुक्त श्री संजय निपाणे, जनसंपर्क अधिकारी श्री संदीप माळवी, उप जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर आणि क्रीडा अधिकारी श्रीमती मीनल पालांडे असे मान्यवर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते.
"हे आमच्या खेळाडूंचं एक उल्लेखनीय यश आहे आणि फक्त मूलभूत प्रशिक्षण सुविधा त्यांना उपलब्ध करून दिल्या गेल्या असल्याने त्यांचं यश अधिक लक्षणीय आहे. भारतात आणि विशेषत: मुंबई ठाण्यात मॉडर्न पेंटेथलॉन खेळाची वाढती लोकप्रियता लक्षात घेता ठाणे महापालिका ह्या खेळाच्या विकासासाठी आवश्यक ती सर्व पावले घेईल आणि त्या अनुशंघाने प्रदेशातील सर्व मॉडर्न पेन्टॅथलॉन खेळाडूंना चांगल्या सुविधा देता येतील" असे आश्वासन माननीय आयुक्तांनी ह्या वेळी दिले.
माननीय महापौर ठाणे महानगरपालिका श्री संजय मोरे यांनी दोन्ही पदक विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी रोख ११००० रुपयांचे बक्षिस दिले आहे व ह्या खेळाडूंचा सत्कार पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे ह्यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे.
"जागतिक स्पर्धेत आमच्या खेळाडूंनी गाठलेले हे यश भारतासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. मॉडर्न पेंटेथलॉन हा ऑलम्पिक दर्जाच्या खेळ लोकप्रिय होत आहे आणि हा खेळ खेळणाऱ्यांची संख्या भारतातील सर्व राज्यांमध्ये वाढत आहे " असे मत नामदेव शिरगावकर, भारत मॉडर्न पेंटेथलॉन फेडरेशन सरचिटणीस, यांनी व्यक्त केले आहे. अलीकडेच ते आशियाई मॉडर्न पेंटेथलॉन महासंघाचे जनरल सेक्रेटरी म्हणूनहि निवडून आले आहेत .
28 देशांतील 500 पेक्षा अधिक खेळाडूं 2016 UIPM जागतिक अंतिम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सारासोता नॅथन बेन्डर्सन पार्क, ह्या फ्लोरिडाच्या पश्चिम किनारपट्टीवर जमले. ह्या स्पर्धेत भारताचे १६ खेळाडू सहभागी झाले त्यापैकी 8 खेळाडू हे स्टारफिश स्पोर्ट्स ऍकेडेमिचेच होते. मयांक चाफेकर, कौस्तुभ मलबारी, जय एकबोटे व यश पावशे, यांचे Triathle सांघिक स्पर्धेत थोडा फरकाने कांस्य पदक हुकले. इतर सहभागी खेळाडू मयुरेश धावडे आणि किमया काजरोळकर यांनी देखील स्पर्धेमध्ये आपापल्या क्रीडावर्गात वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी या सर्व खेळाडूंना प्रशिक्षण शिबिर ठाणे महापालिका आणि स्टारफिश स्पोर्ट्स अकॅडेमी तर्फे आयोजित करण्यात आले. त्यामुळे सगळ्या खेळाडूंना एक खूप प्रोत्साहन मिळाले. दोन्ही सुवर्णपदके पटकावलेले खेळाडू, सवर आणि वेदांत हे स्टारफिश स्पोर्ट्स अकॅडेमित कैलास आखाडे व नरेंद्र पवार ह्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत व हि अकॅडेमि भारतातील मोजकीय संस्थांपैकी एक आहे जिथे मॉडर्न पेंटेथलॉन ह्या खास खेळांचे प्रशिक्षण दिले जाते.