भाजपाला मुंबईपेक्षा ठाण्याचा पेपर कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2017 02:47 AM2017-01-28T02:47:05+5:302017-01-28T02:47:05+5:30
निवडणुकीनंतर ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजपाची तर मुंबईत मात्र भाजपा-शिवसेनेची सत्ता प्रस्थापित करण्याचे मिशन भाजपाने ठरवले आहे
ठाणे : निवडणुकीनंतर ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजपाची तर मुंबईत मात्र भाजपा-शिवसेनेची सत्ता प्रस्थापित करण्याचे मिशन भाजपाने ठरवले आहे. यामुळे कल्याण-डोंबिवलीची पुनरावृत्ती झाल्याचे चित्र दिसेल, असे बोलले जाते.
ठाण्यापेक्षा मुंबईत शिवसेनेला धक्का देणे अधिक सोपे असल्याचे व अभिमानास्पद असल्याचे भाजपाचे नेते खासगीत बोलत आहेत. त्यामुळे ठाण्यात शिवसेना हाच मोठा भाऊ राहील हे भाजपाच्या नेत्यांना मान्य आहे. केडीएमसीत युती तोडून शिवसेना आणि भाजपा प्रथमच स्वबळावर लढले होते. त्यानंतर, सत्तेसाठी मात्र पुन्हा एकत्र येऊन या दोघांनी सत्तेचा सारीपाट मांडला. आता ठाण्यातदेखील तीच परिस्थिती असून या कल्याण-डोंबिवलीतील नाटकाचा दुसरा अंक ठाण्यात रंगणार आहे.
ठाणे महापालिकेत मागील २५ वर्षे युतीत असलेले शिवसेना-भाजपा आता आपसात लढणार आहेत. त्यामुळे यापूर्वी रंगणारा शिवसेना विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी हा सामना आता ठाणेकरांना पाहावयास मिळणार नसून त्या जागी शिवसेना विरुद्ध भाजपा अशी जुंपल्याचे दिसणार आहे. विधानसभेनंतर ठाण्यात पुन्हा शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगणार आहे. २५ वर्षांत काय केले, असे म्हणून ठाण्यात आता भाजपा खऱ्या अर्थाने आपल्या मित्रपक्षाचा अपप्रचार करण्यास सज्ज झाली आहे. मुंबईत शिवसेनेविरोधात प्रचार सुरू केल्यानंतर ठाण्यातही शिवसेनेविरोधात रणशिंग फुंकण्यास भाजपा सज्ज झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत ज्या पद्धतीने भाजपाने इतर पक्षांतील नगरसेवक आपल्या पक्षात आणून शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवण्याचा प्रयत्न केला होता, तसाच काहीसा प्रयत्न आता केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. ठाण्यात शिवसेनेचा सामना मित्रपक्ष भाजपाबरोबरच राष्ट्रवादी बरोबर होणार आहे. केडीएमसी निवडणुकीच्या वेळेस भाजपाने शिवसेनेला ‘सळो की पळो’ करून सोडले होते. (प्रतिनिधी)