ठाण्याचे पासपोर्ट अर्ज मुंबईत स्वीकारणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2015 02:33 AM2015-06-26T02:33:54+5:302015-06-26T02:33:54+5:30
ठाणे पासपोर्ट कार्यालयाने पहिल्यांदाच त्यांच्या हद्दीबाहेर जाऊन पासपोर्ट अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
डोंबिवली : ठाणे पासपोर्ट कार्यालयाने पहिल्यांदाच त्यांच्या हद्दीबाहेर जाऊन पासपोर्ट अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ठाणे कार्यालयातर्फे ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या आठ जिल्ह्यांतील नागरिकांचे अर्ज स्वीकारले जातात. आता मात्र आठवडाभरापासून मालाड-मुंबई येथील पासपोर्ट सेवा केंद्रातही ठाणे पासपोर्ट कार्यालयाचे अर्ज स्वीकारण्याची सोय झाली असून या आठ जिल्ह्यांतील पासपोर्ट अर्जदारांना सोयीनुसार मुंबई केंद्र निवडीची मुभा मिळाली आहे.
याबाबत, ठाणे पासपोर्ट कार्यालयाचे पासपोर्ट अधिकारी टी. डी. शर्मा यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, मालाड पूर्वेकडील टिप्को प्लाझा येथील पासपोर्ट सेवा केंद्रात ठाणे पासपोर्ट कार्यालयाच्या हद्दीतील पासपोर्ट अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र पाच खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत. पश्चिम उपनगरातील नागरिकांना तसेच जे मुंबईला कामाला आहेत, अशांना पासपोर्ट अर्ज भरण्यासाठी ठाणे येथे दिवसाचा खाडा करून यावे लागते. त्यांना मुंबईचे कार्यालय सोयीचे होईल. पासपोर्टसाठीचा कालावधी कमी होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
पासपोर्टसाठी अर्ज करताना अर्जदाराने आॅनलाइनमध्येच त्याला सोयीस्कर असेल तर मालाड येथील कार्यालयात अर्ज भरायची नोंद करून त्यांना वेळ मिळेल. (प्रतिनिधी)