मराठा समाजाच्या भावना समजून MPSC ची परीक्षा पुढे ढकलल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार - संभाजीराजे
By ravalnath.patil | Published: October 9, 2020 07:30 PM2020-10-09T19:30:49+5:302020-10-09T19:33:38+5:30
Sambhaji Raje : एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे खासदार संभाजीराजे यांनी स्वागत केले आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमपीएससीची परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विविध संघटना, नेत्यांकडून होत होती. अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे खासदार संभाजीराजे यांनी स्वागत केले आहे. करत खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मराठा समाजाची भावना पटली असून या निर्णयाबद्दल मी मराठा समाजाच्यावतीने त्यांचे आभार मानतो, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. याचबरोबर, संभाजीराजे यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. "मराठा समाजाच्या भावना समजून एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, याबद्दल मराठा समाजाच्यावतीने सरकारचे सर्वप्रथम आभार!", असे ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे.
मराठा समाजाच्या भावना समजून MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकार ने घेतला याबद्दल मराठा समाजाच्या वतीने सरकारचे सर्वप्रथम आभार!
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) October 9, 2020
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
येत्या 11 तारखेला महाराष्ट्रात 200 जागांसाठी एमपीएससी परीक्षा जाहीर झाली होती. आज आमची बैठक झाली. गेल्या चार महिन्यात कोरोनाचे संकट आहे. गेल्या काही महिने अभ्यासिका, क्लासेस बंद होते. विद्यार्थ्यांच्या सूचना आल्या, अभ्यासाला वेळ मिळायला हवा. त्यामुळे ही परीक्षा काहीकाळ पुढे ढकलत आहोत, यापूर्वी दोनवेळा परीक्षा पुढे ढकलली होती. आता पुढे जी तारीख ठरवू त्याच तारखेला काहीही करून परीक्षा होईल. जे 11 तारखेच्या परीक्षेला पात्र होते, ते सर्व पुढच्या तारखेला म्हणजे जी तारीख जाहीर होईल, त्या तारखेसाठी पात्र असतील, कोणाचंही वय वाया जाणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
The state government has decided to postpone the Maharashtra Public Service Commission (MPSC) exam. Many students had also demanded to postpone it. We will announce the next date of exam soon: Maharashtra CM Uddhav Thackeray
— ANI (@ANI) October 9, 2020
MPSC exam was scheduled for 11th October. #COVID19pic.twitter.com/m0bklM0jm6
'परीक्षा रद्द न केल्यास तीव्र आंदोलन'
मराठा क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी लावून धरली होती. तर खासदार संभाजीराजे यांनी ही परीक्षा रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरकारला दिला होता. 2019मध्ये ज्या एमपीएससी परीक्षा झाल्या त्यात 420पैकी मराठा आणि इतर समजाच्या नियुक्त्या झाल्या नाहीत, हा मुद्दा सरकारसमोर संभाजीराजेंनी बैठकीत मांडला होता. तसेच, एमपीएससीच्या पूर्वीच्या जागा भरल्या नाहीत, मग पुन्हा भरती का काढली हा आमचा प्रश्न आहे. अकरावी आणि अभियांत्रिकी कॉलेज सोडले तर काही अडचण नाही. सरकारने जागा वाढवाव्यात, अशी मागणीही संभाजीराजे छत्रपतींनी केली होती.