कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 06:25 AM2024-11-28T06:25:42+5:302024-11-28T06:26:29+5:30

अडीच वर्षे ज्यांच्या मांडीला मांडी लावून शिंदेंनी सरकार चालवले त्या देवेंद्र फडणवीस यांचे नाव मात्र त्यांनी या पत्रकार परिषदेत घेतले नाही

Thanks to Modi-Shah, but Devendra Fadnavis name was not mentioned in PC, why is Eknath Shinde displeasure? | कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?

कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?

नाव का घेतले नाही?

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पाच दिवस झाले तरी अजून नवा मुख्यमंत्री कोण असेल? त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला आहे. या पत्रकार परिषदेत शिंदेंनी मागील अडीच वर्षे सरकारमध्ये आपण काय निर्णय घेतले, कशाप्रकारे काम केले, यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे त्यांनी आभार मानले. मात्र, अडीच वर्षे ज्यांच्या मांडीला मांडी लावून शिंदेंनी सरकार चालवले त्या देवेंद्र फडणवीस यांचे नाव मात्र त्यांनी या पत्रकार परिषदेत घेतले नाही. त्यामुळे शिंदेंची फडणवीसांबाबत नाराजी आहे का? त्यामुळे त्यांनी नाव घेतले नाही का? अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

बाहेर पडायचे तर आताच पडा

मनसेचे एकमेव आ. राजू पाटील यांचा कल्याण ग्रामीणमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांनी मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पाटील यांनी जोरदार भाषण केले. ते म्हणाले, “आता मी मोकळा झालोय, कोणाला घाबरण्याची गरज नाही. आपल्याला पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लढायचे आहे, कोणीही काळजी करू नका. मी पूर्ण ताकदीने तुमच्यासोबत आहे. जे घाबरत असतील त्यांनी आताच पक्ष सोडायचा की नाही हे ठरवावे. महापालिका निवडणूक तोंडावर असताना कोणी गडबड करू नये.” त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मनसेचे कार्यकर्तेही पक्ष सोडण्याच्या पवित्र्यात आहेत की काय? अशी चर्चा आहे.

मंत्रिपदी वर्णी कुणाची?

महायुतीला निवडणुकीत धवल यश मिळाल्याने कार्यकर्त्यांच्या आशा उंचावल्यात. त्यात भाजपकडे सर्वाधिक  जागा आहेत. त्यामुळे गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या दाेन्ही आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी कार्यकर्त्यांना आशा आहे. गणेश नाईक तथा दादा आणि मंदा म्हात्रे तथा ताई या दोघांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली होती. दादा आघाडी सरकारमध्ये ज्येष्ठ मंत्री होते, तरीही युती सरकारने त्यांना मंत्रिपद न दिल्याने त्यांचे कार्यकर्ते हिरमुसले होते. दादा मात्र शांत राहिले. यावेळी दादा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. तर ताईंनी हॅटट्रिक साधली आहे. यामुळे दोघे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. यामुळे भाजप कार्यकर्ते मात्र मंत्रिमंडळात दादांचा नंबर लागेल की ताईंचा, असे एकमेकांना विचारत आहेत.

प्रचारासाठी पाण्याचा ‘वापर’?

विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारसंघांमध्ये प्रचार कोणकोणत्या पातळ्यांवर आणि कसा केला जातो, याची काही मासलेवाईक उदाहरणे आता समोर येताहेत. एखाद्या गोष्टीचा आधी बागुलबुवा उभा करायचा आणि नंतर आपणच त्या समस्येवर तोडगा काढला असे दाखवायचे, अशी शक्कल काही जणांनी लढवली होती. त्यासाठी थेट पालिकेच्या अधिकाऱ्यांनाच हाताशी धरून पश्चिम उपनगरातील दोन मतदारसंघांमध्ये निवडणुकीपूर्वी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आली होती. मात्र, संभाव्य आमदार कोण होऊ शकतो, हे लक्षात आल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी निमूटपणे योग्य दाबाने पाणीपुरवठा सुरू केला, अशी चर्चा आहे. 

ठाकूर यांचे पुढे काय होणार?

वसई- विरारसह पालघर जिल्ह्यात वर्चस्व असलेल्या बहुजन विकास आघाडीचे तीनही आमदार पराभूत झाल्यामुळे हितेंद्र ठाकूर यांची भूमिका काय असेल, त्यांना  वसई-विरार महापालिका तरी जिंकता येईल का, अशी चर्चा रंगली  आहे. गेली ३५ वर्षे एकहाती वर्चस्व असलेल्या आणि सतत विरोधकांचा सुपडासाफ करणाऱ्या ‘ठाकूरशाही’ ला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठा शह बसला. निकालाने सर्वचजण आश्चर्यचकित झाले असताना ठाकूर यांनीही ‘न कळणारा निकाल’ असे म्हटले आहे. यामुळे ठाकूर काय भूमिका घेतात आणि महापालिका निवडणुकीत त्यांचे काय होईल, याचीच चर्चा आहे.

Web Title: Thanks to Modi-Shah, but Devendra Fadnavis name was not mentioned in PC, why is Eknath Shinde displeasure?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.