'नागपुरातील अपघातातील 'ती' कार चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाची', सुषमा अंधारेंचा आरोप, बावनकुळेंनीही दिले प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 08:03 PM2024-09-09T20:03:37+5:302024-09-09T20:04:06+5:30
नागपुरात काल म्हणजेच रविवारी रात्री एका ऑडी कारने भरधाव वेगात दोन अन्य कार आणि एका दुचाकीला धडक दिली.
नागपुरात काल म्हणजेच रविवारी रात्री एका ऑडी कारने भरधाव वेगात दोन अन्य कार आणि एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघाताने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता या अपघात प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपा नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आरोप केला आहे. अपघातातील ऑडी कार बावनकुळे यांच्या मुलाची असल्याचा आरोप अंधारे यांनी केला. या आरोपाला आता प्रत्युत्तर देत बावनकुळे यांनी ही गाडी आपल्या मुलाच्या नावावर असल्याचे म्हटले आहे.
"शरद पवारांना देव आठवले", लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर भाजपने घेरले
अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करुन म्हटले की, 'रविवारी रात्री नागपुरच्या रामदासपेठमध्ये महागड्या इलेक्ट्रॉनिक ऑडीने अनेक गाड्या उडवल्या. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालक संकेत बावनकुळे असल्याचे समोर येत आहे. मात्र आश्चर्य की आरटीओने गाडीचा नंबर न नोंदवता ही गाडी सोडून दिली, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी कायदा वेगळा का?', असा सवालही अंधारे यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.
दरम्यान, आता या प्रकरणावर भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे म्हणाले, या अपघातातील गाडी माझ्या मुलाच्या नावावर आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी. पोलिसांनी या प्रकरणी कोणालाही वेगळा न्याय देता कामा नये. किंबहुना, यात जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले पाहिजेत. परमेश्वर कृपेने यात कोणीही जखमी झालेले नाही, तर या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. या प्रकरणी मी अजूनही कोणत्याही पोलिस अधिकाऱ्यासोबत बोललो नाही, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
रविवारी रात्री नागपूरच्या रामदासपेठमध्ये महागड्या इलेक्ट्रॉनिक ऑडीने अनेक गाड्या उडवल्या. मध्यधंद अवस्थेत असलेल्या चालक संकेत बावनकुळे असल्याचे समोर येत आहे. मात्र आश्चर्य की RTOनी गाडीचा नंबर न नोंदवता ही गाडी सोडून दिली.@cbawankule साठी कायदा वेगळा का?https://t.co/00VHOS4ive
— SushmaTai Andhare (@andharesushama) September 9, 2024