... म्हणूनच पवार पंतप्रधान झाले नाहीत, प्रफुल्ल पटेल यांचा सनसनाटी दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 11:32 AM2023-12-02T11:32:32+5:302023-12-02T11:33:01+5:30

Sharad Pawar: ऐनवेळी कच खाल्ल्याने शरद पवार तेव्हा पंतप्रधान होऊ शकले नाहीत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या  शिबिरात केला. 

... That is why Pawar did not become Prime Minister, Praful Patel's sensational claim | ... म्हणूनच पवार पंतप्रधान झाले नाहीत, प्रफुल्ल पटेल यांचा सनसनाटी दावा

... म्हणूनच पवार पंतप्रधान झाले नाहीत, प्रफुल्ल पटेल यांचा सनसनाटी दावा

कर्जत  - देवेगौडा पंतप्रधान असताना काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष सीताराम केसरी यांच्याशी त्यांचे खटके उडू लागले. त्रासून त्यांनी पंतप्रधानपद सोडायचे ठरवले. तेव्हा केसरी यांच्याविरोधात निवडणूक लढवलेले शरद पवार यांना त्यांनी बोलावून घेतले. मी सारी ताकद तुमच्या मागे लावतो. तुम्ही पंतप्रधान व्हा, अशी गळ घातली. पण ऐनवेळी कच खाल्ल्याने शरद पवार तेव्हा पंतप्रधान होऊ शकले नाहीत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या  शिबिरात केला. 

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविल्याने केसरी आणि पवार यांचे संबंध मधुर राहिले नव्हते. पण १४० खासदार पवारांसोबत होते. देवेगौडा राजीनामा देणार होते. त्यांचा पाठिंबा असूनही शरद पवार ऐनवेळी माघारी का फिरले, हे मला अजूनही कळाले नाही, असे ते म्हणाले. अजित पवार यांनाही ज्या गोष्टी ठाऊक नाहीत, त्या मला माहिती आहेत. त्यावर मी पुस्तक लिहिणार आहे, त्याची वाटा पाहा, असे पटेल कार्यकर्त्यांना म्हणाले. 

२००४ मध्येच होणार होती युती
- राष्ट्रवादीची २००४ मध्येच भाजपसोबत युती होणार होती. जागावाटपही ठरले होते. पण त्यात त्यावेळी प्रमोद महाजन यांनी खोडा घातला. राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना- भाजप यांची युती करण्याचे तेव्हा ठरले होते.
- अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि जसवंत सिंह यांच्या सूचनेवरून माझ्या घरी बैठक झाली होती. तिन्ही पक्षांनी प्रत्येकी १६ जागा लढवण्याचे ठरवले  होते. दिल्लीत जवळपास सर्व निश्चित झाले होते, असा गौप्यस्फोट पटेल यांनी केला.
-ही युती होणार म्हणून गोपीनाथ मुंढे खुश होते. परंतु चर्चेत मुंढे फारसे सहभागी नव्हते. प्रमोद महाजन यांना ही युती नको होती. कारण जर युती झाली असती, तर दिल्लीतील श्रेष्ठी शरद पवारांचे जास्त ऐकतील आणि आपले महत्त्व कमी होईल, असे त्यांना वाटत होते.
- महाजन यांनी ही बातमी बाळासाहेबांना सांगितली. त्यानंतर बाळासाहेबांनी काही विधाने केली आणि २००४ मध्ये होणारी युती फिसकटली, असा दावा त्यांनी केला.

 

Web Title: ... That is why Pawar did not become Prime Minister, Praful Patel's sensational claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.