ढोलताशांच्या गजरासह नाट्यदिंडीने दुमदुमली ठाणेनगरी

By admin | Published: February 20, 2016 03:23 AM2016-02-20T03:23:33+5:302016-02-20T03:23:33+5:30

आसमंत निनादून टाकणाऱ्या ढोल-ताशा पथकांच्या गजराने ठाणेनगरी दुमदुमून गेली. निमित्त होते, ते ठाण्यात सुरू असलेल्या ९६व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनानिमित्त शुक्रवारी

Thathanagiri with Dhamtashari Gajra | ढोलताशांच्या गजरासह नाट्यदिंडीने दुमदुमली ठाणेनगरी

ढोलताशांच्या गजरासह नाट्यदिंडीने दुमदुमली ठाणेनगरी

Next

ठाणे : आसमंत निनादून टाकणाऱ्या ढोल-ताशा पथकांच्या गजराने ठाणेनगरी दुमदुमून गेली. निमित्त होते, ते ठाण्यात सुरू असलेल्या ९६व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनानिमित्त शुक्रवारी शहराच्या मुख्य रस्त्यांवरून काढलेल्या नाट्यदिंडीचे.
तब्बल तीन तासांहून अधिक वेळ चाललेल्या या दिंडीने नाट्यरसिकांचे लक्ष वेधून घेतले. वारकऱ्यांनी धरलेला टाळमृदंगाचा ताल, हारफुलांनी सजवलेली पालखी, वेगवेगळी वेषभूषा साकारून सहभागी झालेले विद्यार्थी, नाटकांवर आधारित असलेले आकर्षक चित्ररथ, ठाण्याच्या संस्कृतीचे-नाट्यपरंपरेचे दर्शन घडवणारे विविध कलाविष्कार यंदाच्या नाट्यदिंडीचे आकर्षण ठरले. शहरातील मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या या दिंडीची क्षणचित्रे अनेक नाट्यरसिकांनी आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केली. एकीकडे कलाकारांची मांदियाळी तर
दुसरीकडे सामान्य महिलांचा
उत्स्फूर्त सहभाग, हे या दिंडीचे वैशिष्ट्य ठरले.
महिलांनी पारंपरिक वेषभूषेतून मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविले. याचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक जण उत्स्फूर्तपणे धडपडत होता. नाटककार श्याम फडके यांच्या निवासस्थानापासून या नाट्यदिंडीला सुरुवात झाली. हारफुलांनी सजवलेल्या पालखीचे फडके यांची पत्नी सुमती फडके व त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर संजय मोरे, संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर, माजी संमेलनाध्यक्षा फय्याज, संमेलनाचे आयोजक खा. राजन विचारे, आ. संजय केळकर, नाट्यदिंडीचे प्रमुख विद्याधर वालावलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नाट्यदिंडीला सुरुवात होताच तुतारीचा गजर झाला. स्वागताध्यक्ष शिंदे व गवाणकर पालखीचे भोई झाले होते. त्यानंतर, महापौरांनीदेखील काही काळ ही पालखी आपल्या खांद्यावर घेतली. महिलांचे लेझीम पथक, आळंदीहून आलेले वारकरी, ज्ञानदेव सेवा भजनी मंडळ दिंडीत सहभागी झाले होते. ब्राह्मण सोसायटीजवळ येताच हितवर्धिनी सभेच्या वतीने दिंडीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. केरळच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या चेन्नामेळम नावाने ओळखल्या जाणाऱ्या टेम्पल वाद्याचादेखील नाट्यरसिकांनी आस्वाद घेतला. जणूकाही संपूर्ण भारतीय संस्कृतीचेच दर्शन नाट्यदिंडीतून घडत होते, असा हा क्षण होता. रायगड येथून आलेले सुरेश वाळंज यांनी दांडपट्टा प्रात्यक्षिके सादर करून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
ऐरोली येथील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे लयबद्ध लेझीम, जव्हार-मोखाडा येथून आलेल्या आदिवासींचे नृत्य आणि तारपा वाद्याचा गजरही दिंडीत घुमला. अग्निशमन दलाच्या ब्रास बॅण्डचा सहभाग वाखाणण्याजोगा होता. माजी संमेलनाध्यक्षा फय्याज आणि ९६व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष गवाणकर बग्गीत बसले होते. शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता व मावळ्यांच्या वेषभूषेत असलेले ठाणेकर घोड्यावर आरूढ झालेले पाहायला मिळाले. ठाणे भारत सहकारी बँकेचा नांदी चित्ररथ, डीएसव्ही विद्यालयाचा पर्यावरणाचा संदेश देणारा चित्ररथ, सरस्वती मंदिर ट्रस्टचा ‘तो मी नव्हेच’ नाटकाचा चित्ररथ, सरस्वती विद्यालय हायस्कूलचा ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाचा चित्ररथ, दी युनायटेड स्पोर्ट्स क्लबचा नाट्यकर्मींचा चित्ररथ, महाराष्ट्र विद्यालयाचा भक्तिरस चित्ररथ, अभिनय कट्ट्याचा चित्ररथ असे विविध चित्ररथ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. गडकरी रंगायतनजवळ आल्यानंतर अ.भा. मराठी नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी पालखी खांद्यावर घेतली. कोळीवाडा परिसरातील लहान मुलांनी कोळी वेषभूषा साकारून कोळी संस्कृतीचे दर्शन घडवले. गजानन महाराजांच्या मठाजवळ आल्यावर पुन्हा एकदा दिंडीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. महाड तालुक्यातून आलेले फुलचंद नागटिळक यांनी गाडगे महाराजांची वेषभूषा साकारली होती. दिंडीच्या मार्गावर हातात झाडू घेऊन रस्त्याची साफसफाई करून त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला.

Web Title: Thathanagiri with Dhamtashari Gajra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.