त्या मोदी आणि या मोदींमध्ये मोठा फरक, उध्दव ठाकरे यांचे अप्रत्यक्ष मोदींवर टिकास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 04:16 PM2018-10-24T16:16:36+5:302018-10-24T16:19:02+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्ष रित्या टिका केली. ठाण्यात एका कार्यक्र मा दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मिश्किल पद्धतीने टोला मारत मोदींवर टिका केली. सय्यद मोदी प्रशिक्षण अकादमी ठाणे च्या ३० व्या वर्धापन दिना निमित्त ठाण्यात आयोजीत या कार्यक्र माच्या सुरवातीलाच ठाकरे यांनी ठाकरे शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका केली.
ठाणे - आज केतकर आणि मी मोदींच्या प्रशिक्षण अकादमीला जाऊन आलो पण मोदी मोदी मध्ये फरक आहे, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना लगावत ती अकादमी वेगळी आणि ही अकादमी वेगळी आहे, या अकादमीचा आम्हाला अभिमान आहे, या अकादमी साठी जे काही करता येईल ते करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
ठाणे महापालिकेच्या सयद मोदी अकादमीच्या ३० व्या वर्धापन दीनानिमित्त महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी ते ठाण्यात आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते अकादमीतील प्रशिक्षकांचा तसेच ही अकादमी मागील ३० वर्षे चालविणारे श्रीकांत वाड यांचाही सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. ठाण्यातूनही आॅलिम्पकचे गोल्ड मेडल हवे अशी अपेक्षा करून, प्रकाश पदुकोण आणि गोपीचंद अकादमीमध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा मोदी अकादमीला देण्याचे आश्वासन यावेळी ठाकरे यांनी दिले.
आपल्या भाषणामध्ये त्यांनी राजकीय फटकेबाजी करत बॅडमिंटन खेळाडूंबरोबरच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. कुमार केतकर आणि मी या कार्यक्रमाला हजर आहोत, उद्या वर्तमानपत्राची हेडिंग असेल की उद्धव ठाकरे आणि केतकर मोदींच्या कार्यक्र माला उपस्थित. मात्र ज्या मोदींच्या नावाने अकादमी आहे त्या मोदींमध्ये आणि या मोदींमध्ये मोठा फरक असल्याचे सांगून त्यांनी मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. अनेक नामवंत बॅडमिंटन खेळाडूंबरोबर आपण खेळलो, मात्र आपल्याला कधीच चांगला खेळात आले नाही उलट कसे खेळू नये हे माझ्याबरोबर खेळणाऱ्या खेळाडूंना समजले या उद्धव ठाकरे यांच्या विनोदावर सभागृहात हास्य कल्लोळ झाला. बॅडमिंटनमध्ये आणि राजकारणात दोन्ही ठिकणी मला कधीच बँकहॅन्ड जमला नसल्याचेही त्यांनी सांगितले. ठाण्यातील खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आंतराष्ट्रीय दर्जाचे इंफ्रस्ट्रक्चरची गरज असल्याची मागणी प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी केली होती. याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी प्रकाश पदुकोण आणि गोपीचंद अकादमीसारख्या सुविधा ठाण्यात देण्यात येतील असा सांगून आपण केलेली मागणी पूर्ण झाली असे जाहीर केले. मात्र हे देत असताना ठाण्याला आॅलम्पीकचे गोल्ड मेडल हवे अशी अपेक्षा त्यांनी यवक्त केली. या अकादमीचा आम्हाला अभिमान असून त्यासाठी काहीही आम्ही करू. जर आम्ही काही करू शकत नाही तर अधिकार आणिसत्तेचा उपयोगच काय असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
ठाण्यात चांगले खेळाडू असताना दुर्दैवाने या शहरात चांगल्या सुविधा नसल्याची खंत यावेळी राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केली. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अकादमीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार करण्याचे काम केले असून आता या अकादमीला सुविधा देताना कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही दिली.
श्रीकांत वाड यांनी करून दिली उद्धव ठाकरे यांची नवी ओळख -
प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी उद्धव ठाकरे यांची नवी ओळख करून दिली. ज्यांच्या हस्ते सत्कार झाला ते केवळ राष्ट्रीय पातळीवरचे राजकारणी नसून एक बॅडमिंटन खेळाडू देखील असल्याची माहिती वाड यांनी यावेळी दिली. एमआयजी क्लबमध्ये उद्धव ठाकरे आणि माझ्यात बॅडमिंटनचे सामने रंगायचे. त्यावेळी त्यांच्यातील खेळाडू देखील समजला असल्याचे त्यांनी सांगितले. सत्कार हा प्रोत्साहन देणार असला असल्याचे ते म्हणाले. प्रशिक्षकांचाही सत्कार -
यावेळी संस्थेच्या आजी माजी प्रशिक्षकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यामध्ये श्रीराम भालेराव, एस. डी. गद्रे, एस. रामास्वामी, श्रीकांत भागवत, मिलिंद आपटे, अतुल जोशी, मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, प्रशांत बहात्रे, इशान नकवी, चिंतामणी रानडे, संदीप कांबळे, सोनू कुमार, अमित गोडबोले, डॉ सुभोध मेहता , डॉ शुभांगी दातार , रवींद्र कर्वे यांचा सत्कार करण्यात आला.