"तेच ते… तेच ते…’’ भाजपाचा चारोळीतून उद्धव ठाकरेंना टोला, व्यंगचित्रामधून उडवली मुलाखतीची खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 10:30 AM2023-07-26T10:30:54+5:302023-07-26T10:32:36+5:30
BJP Criticize Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्या आज प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीची भाजपाने व्यंगचित्राच्या माध्यमातून खिल्ली उडवली असून, या मुलाखतीत तेच तेच विषय मांडले असल्याचा टोला लगावण्यात आला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग दैनिक सामनामध्ये आज प्रसिद्ध झाला आहे. या भागात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फोडणाऱ्या शिंदे गटासह भाजपावर घणाघाती टीका केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीची भाजपाने व्यंगचित्राच्या माध्यमातून खिल्ली उडवली असून, या मुलाखतीत तेच तेच विषय मांडले असल्याचा टोला लगावण्यात आला आहे.
भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक व्यंगचित्र आणि चारोळी शेअर करत संजय राऊत यांनी घेतलेल्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे. ‘’तेच ते… तेच ते…
माकडछाप दंतमंजन,
तोच ‘जोडा’ तेच रंजन
तीच ‘रडगाणी’ तेच तराणे,
‘बाकी मूर्ख’ तेच शहाणे
सकाळपासून रात्रीपर्यंत…
तेच ते… तेच ते’’, या चारोळीमधून केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तसेच व्यंगचित्राच्या माध्यमातून संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचीही उपाध्ये यांनी खिल्ली उडवली आहे. या व्यंगचित्रामध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत समोरासमोर बसून क्रिकेट खेळत असल्याचे दाखवे आहे. तसेच संजय राऊत यांनी सरपटी चेंडू टाकल्यावर उद्धव ठाकरे तो चेंडू तटवतात. तर संजर राऊत सिक्स म्हणून आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.
तेच ते… तेच ते…
— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 26, 2023
माकडछाप दंतमंजन,
तोच ‘जोडा’ तेच रंजन
तीच ‘रडगाणी’ तेच तराणे,
‘बाकी मूर्ख’ तेच शहाणे
सकाळपासून रात्रीपर्यंत…
तेच ते… तेच ते pic.twitter.com/rtjHHM7Rqf
दरम्यान, सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीमधील पहिल्या भागात त्यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपावर घणाघाती टीका केली. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसैनिकांच्या मेहनतीने जे देऊ शकत होतो ते दिले. बरेच लोक बाहेरून आले तसे गेले असं नाही. ते तसे आले-गेले हा एक भाग झाला, पण ज्यांचा राजकारणातला जन्मच शिवसेनेत झाला. त्यांनीसुद्धा शिवसेना आईवर वार केलाच ना अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर टीका केली.
यावेळी भाजपाने नव्याने मांडलेल्या एनडीएवरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले की, बऱ्याच वर्षांनंतर या देशात 'एनडीए' नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे हे कळलं आणि आपण जे देशभक्त राजकारणी आहोत त्यांची 'इंडिया' नावाची एक आघाडी केलेली आहे त्याला उत्तर देण्यासाठी. त्याच दिवशी आपल्या पंतप्रधानांनी छत्तीस पक्षांची जेवणावळ यातली. खरं म्हणजे छत्तीस पक्षांची त्यांना गरज नाहीय. त्यांच्या 'एनडीए'मध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.