माकडाच्या हातात काकडा दिला की हेच होणार, शेतकरी संघटना नेत्यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 04:24 AM2017-10-20T04:24:51+5:302017-10-20T04:25:04+5:30
‘माकडाच्या हातात काकडा’ दिला की असेच होणार, अशी तिखट प्रतिक्रिया महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विधानाबाबत प्रतिक्रिया देताना व्यक्त केली आहे.
कोल्हापूर : ‘माकडाच्या हातात काकडा’ दिला की असेच होणार, अशी तिखट प्रतिक्रिया महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विधानाबाबत प्रतिक्रिया देताना व्यक्त केली आहे. बुधवारी कोल्हापुरातील कार्यक्रमात ‘सुकाणू समिती सुकलेली आहे’ अशा शब्दांत खोत यांनी खिल्ली उडविली आहे. खोत यांच्या या विधानाबाबत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू
शेट्टी यांनी अतिशय मोजकी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, माणसाची जागा बदलली की तोंडातील भाषाही बदलते. यंदाचा ऊस दर कुठे ठरणार हे भविष्यकाळात खोत यांना समजेल. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील म्हणाले, ‘माकडाच्या हातात काकडा दिला की तो काय पराक्रम करतो, अशातला हा खोतांचा प्रकार आहे.’ भाजपाला विनाशकाले विपरित बुद्धी झाल्याने केवळ संघटना फोडण्यासाठी त्यांनी खोतांना जवळ घेतले आहे. पायाखाली काय जळतेय याचे भान न ठेवता खोत बोलत आहेत. त्याची फळे त्यांना भोगावी लागतील.
सुकाणू समितीचे समन्वयक अजित नवले म्हणाले, दर मेळाव्यात ठरू नये हे खरे आहे. मात्र, जर तो ज्यांनी ठरवायचा ते ठरवत नसतील तर मेळावा घेऊन आणि रस्त्यावर उतरूनच तो ठरवावा लागेल. सदाभाऊ खोत यांना याचा अनुभव आहे. सत्तेला शरण जाणाºयांनी संघटनेच्या प्रकृतीबाबत बोलण्याची गरज नाही. शेतक-यांच्या पोरांनी काढलेली ही संघटना सुकलेली आहे की बाळसे धरलेली आहे हे येणाºया कालावधीत घडणाºया रस्त्यांवरच्या आंदोलनातून ठरणार आहे.
आज ३०० पोलीस ठाण्यांवर मोर्चा
रघुनाथदादा पाटील म्हणाले, शुक्रवारी बलिप्रतिपदा आहे. बळीचा सण आहे. राज्यातील ३०० पोलीस ठाण्यांवर मोर्चा नेला जाणार आहे.
विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणा-या विद्यमान मुख्यमंत्र्यांविरोधात ३०२, ४२० आणि ३०६ कलमानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.