उद्धव ठाकरे यांच्या काळजीपोटी पुत्र आदित्य कॅबिनेट मंत्रीपदी !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 01:49 PM2020-01-06T13:49:23+5:302020-01-06T13:49:46+5:30
आदित्य यांना मंत्रीपद दिल्यामुळे विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांसोबत अधिक वेळ राहिल्यामुळे आदित्य यांना अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहे.
मुंबई - महाविकास आघाडीचा लांबलेला मंत्रीमंडळ विस्तार आणि खाते वाटप अखेर पार पडलं. यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तर अनेक ज्येष्ठांना डच्चू मिळाला आहे. यामध्ये आदित्य ठाकरे यांना देण्यात आलेले कॅबिनेट मंत्रीपद सर्वांसाठी आश्चर्यकारक होते. आदित्य यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाचा भार सोपविण्यात आला आहे.
पहिल्यांदाच विधानसभेत दाखल झालेल्या तीन युवा नेत्यांना मंत्रीमंडळात संधी देण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे आणि प्राजक्त तनपुरे या नेत्यांचा समावेश आहे. या दोघांना राज्यमंत्रीपद दिले आहे. मात्र आदित्य यांची वर्णी कॅबिनेटमंत्रीपदी लावण्यात आली आहे. यामागे उद्धव ठाकरे यांच्या नाजूक प्रकृतीचे कारण आहे.
उद्धव ठाकरे यांची नाजूक प्रकृती पाहता, त्यांच्यासोबत घरातील कोणी तरी असावं अशी कुटुबीयांची इच्छा आहे. कॅबिनेट मंत्री असल्यामुळे उद्धव यांच्यासोबत राहणे आदित्य यांना शक्य होणार आहे. यामुळे उद्धव यांची कुटुबीयांना काळजी घेता येईल. दुसरीकडे आदित्य यांना मंत्रीपद दिल्यामुळे विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांसोबत अधिक वेळ राहिल्यामुळे आदित्य यांना अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहे.