'यामुळे' फडणवीसांना किंमत मोजावी लागली'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 11:08 AM2019-12-03T11:08:13+5:302019-12-03T11:12:35+5:30
विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अनेकदा चकमक झाली होती. फडणवीसांनी पवारांवर तीव्र शब्दांत टीका केली होती. परंतु, निवडणुकीत पवारच भारी ठरले. पवारांनी अनुभवाच्या जोरावर फडणवीसांना विरोधीपक्षात बसायला भाग पाडले ही वस्तुस्थिती आहे.
मुंबई - ‘मी पुन्हा येईन’, असे सगळेच म्हणत असतात, त्यात गैर काहीच नाही, मात्र हे म्हणत असताना देवेंद्र फडणवीस यांनी काही विधाने केली. निवडणुकीच्या काळातील त्यांच्या भाषणांमध्ये मी पणाचा दर्प होता, त्याची त्यांना किंमत मोजावी लागली, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन यावर शरद पवारांना विचारण्यात आले. त्यावर पवार म्हणाले, तुम्हाला लोकांचा पाठिंबा असेल तर त्या पाठिंब्याचा उपयोग आपल्या संघटन वाढीसाठी करून घ्यावा. मात्र त्यात मी पणाचा दर्प असू नये. शेवटच्या प्रचारसभांमधील फडणवीसांच्या भाषणांमधून सत्तेचा दर्प येत होता, असं पवार यांनी सांगितले.
शरद पवार हे इतिहास जमा झालेलं नाव असून आता माझ नाव आहे. त्यांच्या बोलण्यात सत्तेचा दर्प होता. मी म्हणजे सर्वकाही आणि बाकीचे तुच्छ, अशा प्रकारची भूमिका त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला. महाराष्ट्रातील जनतेला हे आवडत नाही. लोकांना विनम्रता आवडते. ते पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्याआधी महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीसांचे वेगळं स्थान नव्हतं. नागपूरचे महापौर असतील, तिथे त्यांच योगदान असेल. विधानसभेत त्यांच योगदान ही त्यांच्यासाठी जमेची बाजू होती. मात्र मी म्हणजे महाराष्ट्र असं समजल्याने त्यांना किंमत मोजावी लागल्याचे पवारांनी नमूद केले.
विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अनेकदा चकमक झाली होती. फडणवीसांनी पवारांवर तीव्र शब्दांत टीका केली होती. परंतु, निवडणुकीत पवारच भारी ठरले. पवारांनी अनुभवाच्या जोरावर फडणवीसांना विरोधीपक्षात बसायला भाग पाडले ही वस्तुस्थिती आहे.