'म्हणूनच यांना डॅाक्टरपेक्षा कंपाऊंडरवर विश्वास आहे'; गोपीचंद पडळकरांचा संजय राऊतांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 08:17 PM2021-12-09T20:17:11+5:302021-12-09T20:17:28+5:30
'शरद पवारांना खुर्ची दिल्याबद्दल मी संजय राऊत यांना नमन करतो'-जितेंद्र आव्हाड
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिल्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या फोटोवरुन भाजप नेते आणि काही ट्रोलर्स राऊतांवर टीका करत आहेत. यातच आता भाजप नेत्या गोपीचंद पडळकर यांनीही राऊतांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.
म्हणूनच यांना डॅाक्टरपेक्षा कंपाऊंडरवर विश्वास आहे!@rautsanjay61@BJP4Maharashtrapic.twitter.com/UZ7L1vdMpw
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) December 9, 2021
मागे एकदा संजय राऊत यांनी डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरवर जास्त विश्वास आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावरुनच गोपीचंद पडळकर यांनी राऊतांवर जहरी टीका केली आहे. पडळकर यांनी ट्विटरवर संजय राऊत शरद पवारांना खुर्ची देतानाचा फोटो पोस्ट केला आहे. तसेच, कॅप्शनमध्ये 'म्हणूनच यांना डॅाक्टरपेक्षा कंपाऊंडरवर विश्वास आहे!' असे लिहीले आहे.
'शरद पवारांना खुर्ची दिल्याबद्दल मी संजय राऊत यांना नमन करतो'
याच प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राऊतांच्या कृतीवर सकारात्कम प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करुन आपली प्रतिक्रीया दिली. 'संजय राऊत यांनी शरद पवारांना बसण्यासाठी खुर्ची दिली. शरद पवारांची प्रकृती पाहता कोणताही माणुसकी असलेला माणूस त्यांना खुर्ची देण्याचा विचार करेल. आपल्यापेक्षा कोणी मोठा माणूस असतो तेव्हा आपण खुर्चीवरुन उठून उभे राहतोच, हे आपले संस्कार आणि संस्कृती आहे. मुख्यमंत्री आल्यानंतर कितीही मोठा मंत्री असला तरी तो उठून उभा राहतो. हा त्या मुख्यमंत्रीपदाचा आदर आहे.'
‘वयोवृद्ध व्यक्ती आली आणि आपल्याला जर त्यांना काय अडचणी आहेत माहिती असेल तर आपणही त्यांना बसायला जागा देतो. मग तो कोण माणुस आहे, हे पाहत नाही. संजय राऊत यांनीही तेच केलं. शरद पवार या व्यक्तिमत्वाबद्दल, वयाबद्दल, त्यांच्या शारिरीक अस्वस्थेबद्दल संजय राऊतांना माहित आहे. त्यामुळेच त्यांनी तात्काळ खुर्ची आणली आणि दिली. संजय राऊत यांचे आभार मानतो आणि त्यांना नमन करतो’, असंही जितेंद्र आव्हाड व्हिडीओमध्ये म्हणाले.