"...म्हणूनच पवार साहेब बदनाम आहेत", 1974चा दाखला देत निलेश राणेंची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 07:26 PM2022-07-24T19:26:24+5:302022-07-24T19:28:00+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिवंगत इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांवर मोठा अन्याय केल्याचा ठपका ठेवला आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिवंगत इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर लेखनातून छत्रपती शिवाजी महाराजांवर मोठा अन्याय केल्याचा ठपका ठेवला आहे. 'बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या लिखानातून महाराजांवर जेवढा अन्याय केला आहे, तेवढा अन्याय अन्य कोणत्याही लेखकाने केला नाही,' असं शरद पवार म्हणाले होते. त्या वक्तव्यावर आता भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
निलेश राणे यांनी ट्विटद्वारे शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. ''पवार साहेबांचं राजकारण किती खालच्या पातळीचं असू शकतं याचा धडधडीत पुरावा. १६ मे १९७४ रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचं कौतुक करणाऱ्या शरद पवारांना आज त्यांचं लिखाण चुकीचं वाटू लागलं आहे. ह्याच वृत्तीमुळे पवार साहेब बदनाम आहेत," अशी खोचक टीका राणे यांनी केली.
पवार साहेबांचं राजकारण किती खालच्या पातळीचं असू शकतं याचा धडधडीत पुरावा. १६ मे १९७४ रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचं कौतुक करणाऱ्या शरद पवारांना आज त्यांचं लिखाण चुकीचं वाटू लागलं आहे. ह्याच वृत्तीमुळे पवार साहेब बदनाम आहेत. pic.twitter.com/abObhA8qUq
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 24, 2022
या कॅप्शनसोबतच निलेश राणे यांनी एका अभिप्रायाचा फोटो शेअर केला आहे. त्यातून शरद पवार बाबासाहेब पुरंदरे यांचे कौतुक करताना दिसत आहेत. राणेंनी शेअर केलेल्या कथित अभिप्रायच्या फोटोमध्ये, 'बाबासाहेब पुरंदरे यांच्या भगिरथ प्रयत्नातून उभारलेली शिवसृष्टी आज पाहता आली, महारांजाच्याबद्दल अपूर्व आत्मियता, अभिमान ही शिवशाहिरांची प्रेरणा असल्याने शिवसृष्टी जीवंत वाटते. राज्याभिषेकाचे दृष्य अतिशय प्रेरणादायक व उत्कृष्ट आहे. या निमित्ताने प्रखर, राष्ट्रभक्ती अपार मातृप्रेम, स्वच्छ चरित्र्य या महाराजांच्या खास गुणांची ओळख होते. शिवसृष्टीमधून या गुणांचा प्रसार नव्या पिढीत होण्याची अपेक्षा या निमित्ताने करूया. शिवशाहिरांच्या प्रयत्नास संपुर्ण सदिच्छा', असा मजकूर लिहिलेला आहे आणि त्याखाली शरद पवार यांची सही दिसत आहे.
काय म्हणाले होते शरद पवार ?
'बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा आणि वास्तववादी इतिहास लिहिला नाही. त्यांनी त्यांच्या लेखनात शिवाजी महाराजांवर कायम अन्याय केला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समाजासमोर आणण्याची गरज आहे. यासाठी नवीन पिढीतील इतिहास तज्ज्ञांनी पुढाकार घेतला पाहिजे,' असे म्हटले होते.