... म्हणूनच ठाकरे पिता-पुत्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 05:51 IST2025-01-13T05:51:02+5:302025-01-13T05:51:30+5:30
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

... म्हणूनच ठाकरे पिता-पुत्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा टोला
रत्नागिरी : कोणताही पर्याय न उरल्याने ठाकरे पिता-पुत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटी घेत असल्याचा टोला राज्याचे उद्योगमंत्री व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी लगावला. ते रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयात आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांशी त्यांची जवळीक वाढल्याबाबत पत्रकारांनी मंत्री सामंत यांना छेडले असता त्यांनी त्यांच्याकडे काेणताच पर्याय नसल्याचे सांगितले.
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘तू राहशील किंवा मी राहीन,’ असे उद्धव ठाकरे एकेरी भाषेत बोलले होते, तसेच मुख्यमंत्री होण्यासाठी मतमोजणीच्या आदल्या दिवशी ड्रेसिंगही करत होते. मात्र, आता पर्याय न राहिल्याने कदाचित गाठीभेटी वाढल्या असतील, असे मंत्री सामंत म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये खरं कधीच नव्हतं. त्यांची युतीही खोटी होती, असे मंत्री सामंत यावेळी म्हणाले.
‘तो’ फुगा फोडला
मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांचा फेक नरेटिव्हचा फुगा आम्ही फोडला आहे. खरे कोण आणि खोटे कोण, हे आता जनतेला कळले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. महाविकास आघाडी ही अनैसर्गिक युती होती. ती जास्त काळ टिकणार नाही. उद्धव ठाकरे यांच्यासाेबत असताना हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी आम्हाला जुमानलं नाही. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांना उठाव करावा लागला. त्यामुळे आता स्वबळावर लढणार, चांद्यापासून बांद्यापर्यंत लढणार, असे ते सांगणारच, असेही सामंत म्हणाले.