'५० खोक्यांचा आरोप करणाऱ्यांनी आमच्याकडेच ५० कोटी मागितले', तो प्रसंग सांगत शिंदेंकडून ठाकरेंची कोंंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 10:51 PM2023-10-24T22:51:54+5:302023-10-24T23:22:25+5:30
Eknath Shinde Criticize Uddhav Thackeray: आज मुंबईतील आझाद मैदानात झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी एकनाथ शिंदें यांनी ५० खोके एकदम ओके म्हणत टीका करणाऱ्या ठाकरे गटावर एक सनसनाटी आरोप केला.
आज मुंबईतील आझाद मैदानात झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी एकनाथ शिंदें यांनी ५० खोके एकदम ओके म्हणत टीका करणाऱ्या ठाकरे गटावर एक सनसनाटी आरोप केला. तसेच शिवसेनेत दोन गट झाल्यावर आमच्यावर ५० खोके घेतल्याचा आरोप करणाऱ्यांनी आमच्याकडेच ५० कोटी रुपये मागितले होते, असा दावा केला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, रक्तांच नातं सांगणाऱ्यांनीच बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटला. यांची बांधिलकी फक्त आणि फक्त पैशांशी, विचारांशी नाही. यांनी कुठलीही सीमा ठेवली नाही. यांनी निर्लज्जपणेचे सगळे कळस गाठले. निवडणूक आयोगाने आपल्याला शिवसेना आणि धनुष्यबाण अधिकृतपणे दिल्यानंतर यांनी शिवसेनेच्या खात्यातील ५० कोटी रुपये बँकेकडे मागितले. बँकेने नकार दिला. बँकेने सांगितले की, निवडणूक आयोगाने शिवसेना अधिकृतपणे शिंदेंना दिली आहे. त्यामुळे ५० कोटी रुपये देता येणार नाही. मग यांनी निर्लज्जपणे पत्र आपल्याकडे पाठवले. तुम्ही आमच्यावर ५० खोक्यांचे आरोप करता आणि ५० खोके आमच्याकडेच मागता. या एकनाथ शिंदेने क्षणाचाही विलंब न लावता ५० कोटी द्यायला सांगितले. मी सांगितलं यांचं प्रेम फक्त पैशांवर आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर नाही. पण मी त्यांना खोके आणि बोके म्हणणार नाही कारण खोके त्यांना पुरत नाहीत. त्यांना जवळून ओळखणारे सांगतात की त्यांना खोके नाही तर कंटेनर लागतात, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
दरम्यान, आज उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठं विधान केलं आहे.शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत मी मराठा समाजासाठी लढणार. इतर कुणावरही अन्याय न करता. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने त्यांची शपथ घेऊन सांगतो की, सर्वांना न्याय मिळवून देईन, असे विधान एकनाथ शिंदे यांनी व्यासपीठावरील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करून सांगितले.