Budget Session: कृषी क्षेत्राचा हात आखडता मात्र उद्योग क्षेत्राची भरारी; अर्थसंकल्पाआधी आला राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 09:01 AM2022-03-11T09:01:39+5:302022-03-11T09:02:09+5:30
Budget Session Maharashtra: देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा आर्थिक वृद्धीदर दीडपटीने अधिक असून, राज्यातील दरडोई उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. कृषी क्षेत्राने कोरोनाच्या कठीण काळात दिलेला हात यंदा मात्र जरा आखडता घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कृषी क्षेत्राने कोरोनाच्या कठीण काळात दिलेला हात यंदा मात्र जरा आखडता घेतला. तर निर्बंध हटल्यानंतर परत भरारी घेत उद्योग व सेवा क्षेत्राने राज्याच्या प्रगतीला बळ दिल्याचे चित्र २०२१-२२ च्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा अहवाल गुरुवारी मांडण्यात आला.
देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा आर्थिक वृद्धीदर दीडपटीने अधिक असून, राज्यातील दरडोई उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेत १२.१ टक्के तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ८.९ टक्के वाढ अपेक्षित आहे. राज्याचा आर्थिक वृद्धीदर देशाच्या तुलनेत अधिक राहण्याची परंपरा यावेळीही जपली आहे. राज्याच्या कृषी क्षेत्राने गेल्यावर्षी १९ टक्के इतकी लक्षणीय वाढ अनुभवली होती. मात्र, यंदा हा आकडा ४ टक्क्यांवर आला आहे. याचा अर्थ कृषी क्षेत्राची वाढ १५ टक्क्यांनी कमी झाली.
दरडोई उत्पन्न सव्वा दोन लाखांवर
राज्याच्या दरडोई उत्पन्नात यंदा वाढ झाली आहे. २०१९-२० मध्ये हे उत्पन्न १ लाख ९६ हजार रुपये तर २०२०-२१ मध्ये ते १ लाख ९३ हजार रुपये इतके होते. यंदा ते २ लाख २५ हजार ७३ रुपये इतके राहील, असा अंदाज आहे.
nराज्याचा महसुली खर्च ३ लाख ७९ हजार २३१ कोटी रुपये तर महसुली जमा ३ लाख ६८ हजार ९८७ कोटी रुपये अपेक्षित आहे.
nकोरोनाचे निर्बंध खुले झाल्यानंतर उद्योग क्षेत्रात ११.९ टक्के तर सेवा क्षेत्रात १३.५ टक्के वाढ झाली. वस्तुनिर्माण व बांधकाम क्षेत्रात अनुक्रमे ९.५ टक्के व १७.४ टक्के वाढ दिसत आहे.
कृषी उत्पादनात घट
मागील वर्षीच्या तुलनेत खरीप हंगामात तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, कापूस व ऊस यांच्या उत्पादनात अनुक्रमे ११, २७, १३, ३० आणि ०.४ टक्के इतकी घट झाली. रब्बी हंगामात कडधान्याच्या उत्पादनात १४ टक्के वाढ अपेक्षित आहे. मात्र, तृणधान्ये व तेलबियांच्या उत्पादनात अनुक्रमे २१ आणि ७ टक्के घट अपेक्षित आहे.