"पुरातत्व विभागाकडे कथित कुत्र्याची कुठलीच माहिती नाही", संभाजीराजेंनी थेट पुरावाच दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 23:38 IST2025-03-26T23:16:13+5:302025-03-26T23:38:04+5:30

समाधीबाबत पुरातत्त्व विभागाकडे कुठलीही माहिती नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले',अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. 

The Archaeological Department has no information about the alleged dog Sambhaji Raje gave direct evidence | "पुरातत्व विभागाकडे कथित कुत्र्याची कुठलीच माहिती नाही", संभाजीराजेंनी थेट पुरावाच दिला

"पुरातत्व विभागाकडे कथित कुत्र्याची कुठलीच माहिती नाही", संभाजीराजेंनी थेट पुरावाच दिला

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसमोर असलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे. या मुद्द्यावरुन आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, आता संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्लीतील पुरातत्व विभागाला भेट दिली आहे. 'पुरातत्व विभागाने गडावरील हा कथित कुत्रा व त्याच्या समाधीबाबत पुरातत्त्व विभागाकडे कुठलीही माहिती नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले',अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. 

Sambhaji Bhide : "वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य"; संभाजीराजेंच्या मुद्द्याला संभाजी भिडेंचा विरोध

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली.  "पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून जुनी असलेली वास्तू ही ऐतिहासिक संरक्षित वास्तू म्हणून गणली जाते. मात्र कुत्र्याची समाधी ही अलीकडच्या काळात १९३६ साली उभारण्यात आली आहे. त्यामुळे तिला १०० वर्षे पूर्ण होण्याआधी काढणे अत्यंत गरजेचे आहे, असंही या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

"वाघ्या नामक कुत्र्याचा आणि त्याच्याबद्दल जी दंतकथा सांगितली जाते की त्याने शिवरायांच्या चितेत उडी घेऊन प्राणत्याग केले, त्याला इतिहासात कुठलाही पुरावा नाही, असं स्पष्ट या पोस्टमध्ये म्हटले आहे.

फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटले आहे?

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर असलेली एका काल्पनिक कुत्र्याची समाधी हटवावी, याकरिता राज्याच्या मुख्यमंत्र्याना पत्र दिले होते. आज याच संदर्भात दिल्ली येथे भारतीय पुरातत्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांची भेट घेतली. यावेळी विभागाचे इतर वरिष्ठ संचालक व अधिकारी देखील उपस्थित होते. गडावरील हा कथित कुत्रा व त्याच्या समाधीबाबत पुरातत्त्व विभागाकडे कुठलीही माहिती नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून जुनी असलेली वास्तू ही ऐतिहासिक संरक्षित वास्तू म्हणून गणली जाते. मात्र कुत्र्याची समाधी ही अलीकडच्या काळात १९३६ साली उभारण्यात आली आहे. त्यामुळे तिला १०० वर्षे पूर्ण होण्याआधी काढणे अत्यंत गरजेचे आहे.

वाघ्या नामक कुत्र्याचा आणि त्याच्याबद्दल जी दंतकथा सांगितली जाते की त्याने शिवरायांच्या चितेत उडी घेऊन प्राणत्याग केले, त्याला इतिहासात कुठलाही पुरावा नाही. 

पुण्यातील काही मंडळीनी लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वात शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले होते. ते काम १९२६ साली पूर्ण झाले. पण हा कुत्र्याचा पुतळा त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे १९३६ साली तिथे बसविला गेला.

राजसंन्यास या नाटकातील एका कुत्र्याच्या काल्पनिक पात्राचा संदर्भ घेऊन हा पुतळा तिथे उभारला आहे. हे तेच नाटक आहे ज्या नाटकाने सगळ्यात पहिला छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी सुरू केली. त्यांच्या चारित्र्यावर डाग लावले गेले. अशा नाटकाचा आज काही जणांना त्या कुत्र्यासाठी पुळका आलेला आहे. मग त्यामध्ये केलेली छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी देखील त्यांना मान्य आहे का ? 
छत्रपती शिवाजी महाराजांकडे अनेक कुत्री असतील याबाबत काही शंका नाही. महाराजांकडे कुत्राच नव्हता असे आम्ही म्हणत नाही. कुत्रा हा प्राणी मनुष्याचा हजारो वर्षांपासून मित्र आहे. महाराजांनी देखील निश्चितपणे अनेक कुत्री पाळली असतील. पण म्हणून थेट त्यांच्या समाधीला लागून कुत्र्याचा पुतळा उभा करायचा, आणि तो सुद्धा महाराजांच्या समाधीपेक्षाही उंच ! हे काय पटण्यासारखे नाही. स्वराज्यासाठी हजारो लाखो मावळ्यांनी आपले बलिदान दिले आहे, त्यांच्या समाध्या आज कुठे नाहीत. आणि एका काल्पनिक कुत्र्याची समाधी महाराजांच्या समाधीसमोर उभारणे हे योग्य आहे का ? हा महाराजांचा आणि त्या हजारो लाखो मावळ्यांचा अपमान नाही का ? 

इंदूरचे राजे तुकोजीराव होळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पैसे दिलेले होते, कुत्र्याच्या समाधीसाठी नाही. त्यांनी कुत्र्याच्या समाधीसाठी पैसे दिले होते हे म्हणणे म्हणजे तुकोजीराव होळकरांचा अपमान आहे. कारण तुकोजीराव होळकर हे मोठे शिवभक्त होते. छत्रपती शाहू महाराजांनी जे पहिले मराठी शिवचरित्र लिहून घेतले होते, त्याचे त्यांनी इंग्रजी भाषांतर करून ते पुस्तक देशभरातील ग्रंथालयांना स्वखर्चाने पाठवले होते. इतका मोठा शिवभक्त माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर चक्क एका कुत्र्याची समाधी बांधायला सांगू शकेल का ? तुकोजीरावांबद्दल असे बोलणे म्हणजे त्यांचा आणि त्यांच्या शिवभक्तीचा अपमान आहे. 
त्यामुळे विनाकारण काही लोकांनी या विषयाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये. यामुळे नकळत एकप्रकारे तुकोजीराव होळकर यांचीच बदनामी होत आहे. 
छत्रपती घराणे आणि होळकर घराण्याचे जुने ऋणानुबंध आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या जनक घराण्यातील बहिणीचे लग्न याच तुकोजीराव होळकरांच्या मुलाशी लावून दिलेले होते. हा पहिला आंतरजातीय विवाह होता. 
माझे आजोबा छत्रपती शहाजी महाराज यांनी जवळपास पन्नास वर्षांपूर्वी होळकरांचे सध्याचे वंशज भूषणसिंह होळकर यांचे आजोबा श्रीमंत शिवनारायणराव होळकर यांचा विवाह आपल्या राजवाड्यात लावून दिलेला होता. आजपर्यंत छत्रपती घराण्यातील सदस्यांव्यतिरिक्त कुणाचाही विवाह छत्रपतींच्या राजवाड्यात झालेला नाही. फक्त श्रीमंत शिवनारायणराव होळकर यांचा विवाह झालेला आहे. इतके छत्रपती घराण्याचे आणि होळकर घराण्याचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे होळकरांना विरोध म्हणून आम्ही हा मुद्दा हाती घेतला आहे, असे म्हणून जे लोक धनगर बांधवांच्या भावना पेटवू पाहत आहेत त्यांचा उद्देश सफल होणार नाही. 
इतिहासापासून ते आजपर्यंत धनगर समाज हा छत्रपती घराण्याचा अत्यंत विश्वासू आणि लाडका समाज राहिलेला आहे. आजही आमच्याकडे विविध पदांवर अत्यंत विश्वासाने कार्यरत असलेले जवळपास निम्मे लोक धनगर समाजातील आहेत. त्यामुळे धनगरांच्या द्वेषामुळे आम्ही हा मुद्दा घेतलाय असे सांगून आमच्या धनगर बांधवांची दिशाभूल करू नये. विनाकारण जातीय रंग देऊ नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर कुत्र्याचा पुतळा बघणे हे कोणत्या शिवभक्त धनगर बांधवाला आवडणार आहे ? 
------------

शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना महाराजांच्या रक्षा मिळाल्या होत्या. त्यावेळी या रक्षा कोलकाता येथील लॅब मध्ये परिक्षणासाठी पाठविल्या होत्या. त्या लॅबच्या रिपोर्टमध्ये या रक्षांमध्ये श्वानाचे अवशेष आढळून आलेले नाहीत. त्यामुळे शिवरायांच्या चितेत कुत्र्याने उडी घेऊन जीव दिला होता या दंतकथेला काही अर्थ राहत नाही. 
३१ मे हा अल्टिमेटम वगैरे काही दिलेला नाही. माझ्या पत्रात अल्टिमेटम वगैरे असा काही उल्लेख नाही. राज्य शासनाने गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी धोरण जाहीर केलेले आहे आणि या धोरणानुसार ३१ मे पर्यंत सर्व अतिक्रमणे हटवली जाणार, असे राज्य शासनानेच जाहीर केलेले आहे. ही तारीख राज्य शासनाची आहे. त्यामुळे त्यांनीच दिलेल्या तारखेच्या आधी हे अतिक्रमण काढावे, अशी मी मागणी केलेली आहे. हा अल्टिमेटम नाही. या तारखेमुळे देखील काही विघ्नसंतोषी लोकं गैरसमज निर्माण करू पाहत आहेत, त्यांनी याची आधी माहिती घ्यावी. 
आम्ही संविधानिक मार्गानेच हा पुतळा हटवणार असून कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेणार नाही, याचे आश्वासन मी देतो. त्यामुळे गैरसमज निर्माण करणाऱ्या लोकांना कुणीही बळी पडू नये. 
कोणताही वाद लावण्याचा किंवा समाजासमाजात भांडण लावण्याचा हा विषय नाही. सर्वांना सोबत घेऊन एकविचाराने आणि शांततेने हा पुतळा हटवायचा आहे. यासाठी मी कुणाशीही चर्चेला तयार आहे. ज्याना आक्षेप आहे त्या लोकाना मी खुल्या चर्चेचे निमंत्रण देतो. मीडियासमोर आपण जाहीर चर्चा करून पुढे जाऊ. मला लपवून किंवा परस्पर काहीही करायचे नाही. कधीही सांगावे मी खुल्या चर्चेस तयार आहे. उगाच कुणीही प्रेस कॉन्फरन्स घेऊन आरोप प्रत्यारोप करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करू नये.
- संभाजी छत्रपती

Web Title: The Archaeological Department has no information about the alleged dog Sambhaji Raje gave direct evidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.