भाजपा अजगर अन् मगरीसारखी, सोबत असतात त्यांना खाऊन टाकते; संजय राऊतांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 11:22 AM2023-05-27T11:22:07+5:302023-05-27T11:22:57+5:30
ज्यांनी शिवसेनेच्या पाठित खंजीर खुपसला, बेईमानी केली, जे पैशाला विकले गेले त्यांच्यासाठी परत दरवाजे उघडले जाणार नाही असा उद्धव ठाकरेंनी धोरणात्मक निर्णय घेतला आहे असं राऊतांनी सांगितले.
मुंबई - भाजपा अजगर, मगरीसारखी आहे. जे त्यांच्यासोबत गेले त्यांना भाजपाने खाऊन टाकले. भाजपाचा मूळ स्वभाव आणि भूमिका सोडली नाही. गजानन किर्तीकरांसारखा आमचे जुने सहकारी तिथे जाऊनसुद्धा सुखी आनंदी नाहीत याचा अर्थ भाजपाने हा कोंबड्यांचा खुराडा पाळला आहे. त्यातील एक एक कोंबडी कापायला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरेंची भूमिका योग्य होती हे त्यांना कळेल अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि शिंदे गटावर केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, गजानन किर्तीकर सोडून जाणे हे आमच्यासाठी वेदनादायी होते, पण आज ते भाजपा आम्हाला लाथा घालतायेत, नीट वागवत नाही असं सांगतात, मग आम्ही काय वेगळे सांगत होतो. भाजपा शिवसेनेला सावत्रपणाची वागणूक देतेय, म्हणून शिवसेना त्यांच्यापासून वेगळी झाली, फुटलेल्या गटात अस्वस्थता आणि नाराजी आहे. झालेल्या गटातच २ गट पडले आहेत. गजानन किर्तीकरांनी जे सांगितले ती आमची भूमिका आहे. दिलेला शब्द पाळला नाही, शिवसेनेच्या आमदार, खासदारांची कामे रखडवून ठेवली. सत्तेत असताना निधी दिला जात नव्हता. प्रमुख लोकांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला. समान भागीदारी असून शिवसेनेला न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सर्वांशी चर्चा करून एक भूमिका घेतली तेच आज सांगितले जातंय असं त्यांनी म्हटलं.
गद्दारांना पुन्हा प्रवेश नाही
ज्यांनी शिवसेनेच्या पाठित खंजीर खुपसला, बेईमानी केली, जे पैशाला विकले गेले त्यांच्यासाठी परत दरवाजे उघडले जाणार नाही असा उद्धव ठाकरेंनी धोरणात्मक निर्णय घेतला आहे आणि ही महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेची आणि शिवसैनिकांची इच्छा आहे. आम्हाला शिवसैनिकांना तोंड द्यावे लागेल. गद्दारांबद्दल रोष व्यक्त होतोय. आमच्या संपर्कात आहेत, मेसेज देतात. चेहऱ्यावर काहीही असले तरी मनातील भावना गजानन किर्तीकरांनी बोलून दाखवली. जे पक्ष सोडून गेले त्यांना पुन्हा प्रवेश नाही. आमच्याच नाही सर्व पक्षातील लोकांनी हेच करावे असं सांगत राऊतांनी शिंदेसोबत गेलेल्यांसाठी परतीचे दरवाजे बंद केल्याची माहिती दिली.
देवेंद्र फडणवीसांची दया येते....
महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीत आहे. मुख्यमंत्री सातत्याने दिल्लीत हेलपाटे मारतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय जबाबदारी आहे माहिती नाही. आधी मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते आणि उपमुख्यमंत्री झाले. काल मुख्यमंत्र्यांची गाडी चालवत होते. मला देवेंद्र फडणवीसांची दया आणि किव येते. या संकटातून फडवीसांची सुटका व्हावी ही प्रार्थना आहे असा खोचक टोला राऊतांनी फडणवीसांना लगावला.
अर्बन नक्षलवाद हे भाजपा सरकारचे अपयश
अर्बन नक्षलवाद अद्याप मोडता आला नाही त्याला जबाबदार कोण? गृहमंत्री कोण आहेत? हे तुमचे अपयश आहे. तुमच्या व्यवस्थेविरोधात हे बंड आहे. सरकार कष्टकरी, शेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्न सोडवण्यात अपयशी पडतेय, त्यामुळे अशा वृत्ती, प्रवृत्ती राज्यात फोफावतायेत. हे तुमच्या सरकारचे अपयश आहे. नक्षलवादाच्या नावाखाली निरपराध, चुकीच्या लोकांना अटक करताय. खोट्या प्रकरणात गृहखात्याचा वापर करून तुम्ही लोकांना नक्षलवादी ठरवताय असा आरोप राऊतांनी भाजपा सरकावर केला.