असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 06:39 PM2024-10-18T18:39:04+5:302024-10-18T18:41:28+5:30
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा एक नेता फाईलने चेहरा लपवून शरद पवारांकडे विधानसभा उमेदवारीसाठी मुलाखत देण्यास पोहोचला होता.
NCP Sharad Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीतील दमदार कामगिरीनंतर आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर लढण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली असून मागील काही दिवसांत महायुतीच्या अनेक नेत्यांनी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अशातच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा एक नेता फाईलने चेहरा लपवून शरद पवारांकडे विधानसभा उमेदवारीसाठी मुलाखत देण्यास पोहोचला होता. त्यानंतर आता भाजपच्याही एका आमदाराबाबत काहीसा असाच किस्सा घडला आहे.
भाजपचे विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील हे आज शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या परिसरात आले होते. मात्र तिथे माध्यमांचे कॅमेरा पाहताच कारमध्ये मास्क घालून बसलेल्या रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी माध्यमांची नजर चुकवण्याचा प्रयत्न करत चालकाला तिथून गाडी काढण्यास सांगितले आणि ते निघून गेले. रणजीतसिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. यासंदर्भातच चर्चा करण्यासाठी आज ते पवार यांना भेटण्यास जात होते, असे समजते.
दरम्यान, रणजीतसिंह मोहिते पाटील हे लवकरच आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील, अशी माहिती आहे. याबाबत आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
माढ्यातून तुतारी हाती घेण्यासाठी इच्छुकांची गर्दी
माढा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून लढण्यासाठी तीन बडे नेते इच्छुक आहेत. यामध्ये विद्यमान आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे, भाजपचे विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची साथ सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलं. मात्र लोकसभा निवडणुकीत या तालुक्याने महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांना मोठी आघाडी दिल्याने आमदार बबन शिंदे यांना विधानसभेची लढाई सोपी असणार नाही, हे निश्चित झाले. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच बबन शिंदे यांनी आपण निवडणुकीतून माघार घेणार असून चिरंजीव रणजीत शिंदे हे निवडणूक रिंगणात असतील, अशी घोषणा केली. तसंच शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास हाती तुतारी घेऊ अन्यथा अपक्ष लढू, असंही त्यांनी जाहीर केलं आहे. त्यानंतर शिंदे पिता-पुत्राने शरद पवार यांची भेटही घेतली आहे.
दुसरीकडे, शरद पवार यांच्यासोबत असणाऱ्या अभिजीत पाटील यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत पवार यांची साथ सोडत साखर कारखान्यातील अडचणींमुळे महायुतीला साथ दिली होती. मात्र हेच अभिजीत पाटील हे माढ्यातून तुतारी हाती मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपचे विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील हेदेखील मागील काही दिवसांपासून पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर असून माढ्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा आहे.