मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवत अल्पसंख्यांक विकास विभागाच्या सचिवांनी केलं होतं पुस्तक प्रकाशन
By मनोहर कुंभेजकर | Published: March 27, 2023 04:48 PM2023-03-27T16:48:17+5:302023-03-27T16:48:41+5:30
अल्पसंख्यांक विकास विकास विभागाच्या तत्कालिन अप्पर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी या सप्टेंबर महिन्यात सेवानिवृत्त झाल्या. त्याआधी घाई-गडबडीत पुस्तकाच्या प्रकाशनाचे सोपस्कार उरकून घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अंधारात ठेऊन अल्पसंख्यांक विभागाच्या माहिती पुस्तीकेचं गेल्या सप्टेंबर महिन्यात प्रकाशन झाल्याची धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे.तर पुन्हा अल्पसंख्यांक विकास विभागाचे नव-नियुक्त सचिव डॅा. अनुपकुमार यादव यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर नागपूर हिवाळी अधिवेशना दरम्यान दि,१८ डिसेंबर रोजी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झालेल्या सदर पुस्तिकेचे पुन्हा प्रकाशन केले.
कोणत्याही सरकारी विभागाच्या माहिती पुस्तीकांचं प्रकाशन सबंधीत खात्याच्या मंत्र्यांच्या हस्ते करणं अपेक्षित असताना आधी अप्पर मुख्य सचिवांनी प्रकाशन करुन नंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून या पुस्तकेचे प्रकाशन केले. दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या अल्पसंख्यांक विभागात प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्री महोदयांनाच अंधारात ठेऊन कशा प्रकारे प्रशासन चालवतात, याचं वास्तव समोर आलेले आहे. महत्त्वाची बाब अशी नव-नियुक्त सचिवांनी देखील पुस्तीकेचं आधीच प्रकाशन झालेलं आहे, ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास न आणता नागपूर हिवाळी अधिवेशना दरम्यान घाई-गडबडीत पुस्तक प्रकाशन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करुन घेतले अशी माहिती आहे.
अल्पसंख्यांक विकास विकास विभागाच्या तत्कालिन अप्पर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी या सप्टेंबर महिन्यात सेवानिवृत्त झाल्या. त्याआधी घाई-गडबडीत पुस्तकाच्या प्रकाशनाचे सोपस्कार उरकून घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्यावेळी या पुस्तक प्रकाशनाची पोस्ट फेसबुक वर टाकण्यात आली होती,मग त्याचा गाजावाजा झाल्याने ही पोस्ट काढण्यात आली होती अशी माहिती लोकमतला मिळाली आहे. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रांचा हस्ते पुस्तकीचे प्रकाशन होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप सदर माहिती पुस्तिका विधानसभा,विधानपरिषद सदस्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये वितरित करण्यात आलेल्या नाहीत.
अल्पसंख्यांक विभागातर्फे अल्पसंख्यांक समाज बांधवांना विविध योजनांची माहिती व्हावी व त्या योजनांचा लाभ समाज बांधवांना मिळावा हा उद्देश समोर ठेऊन ह्या पुस्तीका छापल्या जातात. मात्र २५ लाखांपेक्षा जास्त खर्चुन छापलेल्या या पुस्तीका दोन वेळा प्रकाशित होऊन देखील सरकारी प्रिंटिंग प्रेस मध्ये धुळ खात पडून होत्या.आता या पुस्तिका गेल्या शनिवारी मंत्रालयात अल्पसंख्यांक विभागात आल्याचे समजते.
याबाबत लोकमतच्या सदर प्रतिनिधीने मंत्रालय येथील अल्पसंख्यांक विकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, सदर पुस्तिका आमच्या कडे आल्या आहेत. मार्च इयर इंडिगमुळे आम्ही सर्व कामात बिझी असून तुम्ही २-३ तारखेला ऑफिसला आलात तर तुम्हाला पुस्तिका देतो अशी माहिती त्यांनी दिली.