धनुष्यबाण चिन्ह यंदा काही ठाकरेंच्या हाती नाही; आता पुढील वर्षी सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 07:11 AM2022-12-13T07:11:48+5:302022-12-13T07:12:08+5:30
ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर केली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खासदार अनिल देसाई उपस्थित होते. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने कुणीही हजर नव्हते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : धनुष्यबाण कोणाचा यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आता पुढील वर्षी म्हणजेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटाने दावा सांगितला आहे. याची सुनावणी मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर सुरू आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत केवळ पाच ते सात मिनिटांत दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आयुक्तांनी सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलली आहे.
ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर केली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खासदार अनिल देसाई उपस्थित होते. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने कुणीही हजर नव्हते. दोन्ही गटांकडून आयोगात वकिलांची फौज हजर होती. कोणत्या पक्षाने किती सदस्यांची माहिती सादर केली आहे, किती कागदपत्रे दिली आहेत याबद्दल पुढील सुनावणीमध्ये चर्चा होणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने १५ लाखांपेक्षा जास्त प्राथमिक सदस्यांचे पत्र, तीन लाखाच्या जवळपास शपथपत्र आयोगात सादर केली आहेत. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने ७ लाख सदस्यांची नावे दिली आहेत. ठाकरे गटाने शिंदे गटापेक्षा दुप्पट सदस्यांची यादी दिली आहे.