विधानपरिषदेचा भार दोन देसाईंवर; विरोधकांच्या टोमण्यानंतर वाजली सत्ताधाऱ्यांची बाके

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 06:04 AM2022-03-12T06:04:09+5:302022-03-12T06:04:40+5:30

अर्थराज्यमंत्री शंभुराज देसाई सभागृहात येताच सत्ताधारी बाकांवरून घोषणाबाजी सुरू झाली. शिवरायांचा जयघोष केला.

The burden of the Legislative Council budget presentation falls on Shambhuraj Desai and Subhash Desai | विधानपरिषदेचा भार दोन देसाईंवर; विरोधकांच्या टोमण्यानंतर वाजली सत्ताधाऱ्यांची बाके

विधानपरिषदेचा भार दोन देसाईंवर; विरोधकांच्या टोमण्यानंतर वाजली सत्ताधाऱ्यांची बाके

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : विधानपरिषदेत अर्थराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला. बंद गळ्याचा कोट घातलेले शंभुराज देसाई लगबगीने सभागृहात आले. आपल्या छोट्या बॅगेतून अर्थसंकल्पाची प्रत काढली. सभापतींच्या परवानगीनंतर तब्बल तासभर अर्थसंकल्पाचे वाचन केले. पण, सभागृहात उद्योगमंत्री सुभाष देसाई वगळता अन्य कोणी वरिष्ठ मंत्री नव्हते. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत असल्याने बहुतांश मंत्री तिथेच थांबले. त्यामुळे सत्ताधारी बाकांवर एक प्रकारची स्तब्धताच होती. विरोधकांनी अधुनमधून मारलेल्या टोमण्यानंतर सत्ताधारी आमदारांनी बाके वाजवत अर्थसंकल्पातील तरतुदींचे स्वागत करण्याची तसदी घेतली.

अर्थराज्यमंत्री शंभुराज देसाई सभागृहात येताच सत्ताधारी बाकांवरून घोषणाबाजी सुरू झाली. शिवरायांचा जयघोष केला. तोवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह विरोधी सदस्यही सभागृहात आले. सत्ताधाऱ्यांच्या घोषणेत दम नसल्याचे सांगत विरोधी बाकांवर उच्चस्वरात घोषणा आली. त्याला उत्तर म्हणून अंबादास दानवे यांनी खास शिवसेना स्टाईलमध्ये घोषणा द्यायला सुरुवात केली. देसाई अर्थसंकल्पाचे सलग वाचन करत होते. त्यामुळे एकीकडे वाचन सुरू ठेवत पिण्याच्या पाण्याचा ग्लास शोधण्याचा त्यांनी काहीवेळा प्रयत्न केला. पण, पोडियम खालचा ग्लास त्यांच्या हाती लागत नव्हता. अखेर पाऊण तासाच्या सलग वाचनानंतर क्षणभर थांबत त्यांनी ग्लास हाती घेतला आणि पाण्याचा घोट घेतला. 

वाचन संपताच विरोधकांंकडून निषेधाच्या घोषणा
अर्थसंकल्पातील एखाद्या तरतुदीनंतर सत्ताधारी सदस्य जोरात बाके वाजवत घोषणेचे स्वागत करतात. पण, आज सत्ताधारी बाकांवर पुरता निरुत्साह होता. विरोधक मात्र बसल्या जागेवरून नेमकी टोलेबाजी करत होते. विरोधकांच्या कुजबुजीचा आवाज वाढतच गेला. एसटीसंदर्भातील तरतूद अर्थराज्यमंत्री सांगत होते, तेव्हा तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे काय, असा आवाजही विरोधी बाकांवरून आला. अर्थसंकल्पाचे वाचन संपताच विरोधकांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. या घोषणाबाजीतच कामकाज संपले.

Web Title: The burden of the Legislative Council budget presentation falls on Shambhuraj Desai and Subhash Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.