मुख्यमंत्री नेमणार सल्लागार समिती, दर पंधरा दिवसांनी घेणार आढावा बैठक
By महेश चेमटे | Published: September 8, 2022 11:54 AM2022-09-08T11:54:55+5:302022-09-08T11:57:07+5:30
राज्य कारभार चालवताना मुख्यमंत्री प्रशासनातील विविध खात्यांच्या सचिवांचा सल्ला घेत असतात.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेली राज्य सल्लागार समिती नियुक्त करणार आहेत. ही समिती मुख्यमंत्र्यांना विविध क्षेत्रातील विकासासाठी सल्ला देण्याचे काम करेल. दर १५ दिवसांनी समितीची बैठक घेऊन मुख्यमंत्री राज्याच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत.
राज्य कारभार चालवताना मुख्यमंत्री प्रशासनातील विविध खात्यांच्या सचिवांचा सल्ला घेत असतात. नव्या योजना, विकास प्रकल्पांची आखणी करताना हे सचिव मुख्यमंत्र्यांना सल्ला देतात. काही बाबतीत खासगी संस्थांकडूनही सल्ला घेतला जातो. मात्र, मुख्यमंत्री आता राज्य सल्लागार समितीच स्थापन करणार असून त्यात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश केला जाणार आहे. हे तज्ज्ञ मुख्यमंत्र्यांना संबंधित क्षेत्रात राज्य आघाडीवर कसे जाईल, याबाबत सल्ला देतील.
आरोग्य, शिक्षण, कृषी क्षेत्रावर भर
- शिंदे गट - भाजप युती सरकारचा मुख्य फोकस हा आरोग्य, शिक्षण आणि कृषी क्षेत्रावर असणार आहे. त्यासाठी या क्षेत्रातील विशेष तज्ज्ञ राज्य सल्लागार समितीमध्ये नियुक्त केले जाणार आहेत.
- त्यांच्या सल्ल्याने या क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याचा या सरकारचा प्रयत्न असणार आहे. राज्यात रोजगार कसा वाढवायचा, कोणत्या विकासाच्या योजना राबवायच्या, याचा सल्लाही ही समिती मुख्यमंत्र्यांना देणार आहे.