रिक्षा, टॅक्सी चालकांच्या मंडळाची रूपरेषा ठरणार, मुख्यमंत्र्यांनी घातलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 12:22 PM2022-07-27T12:22:01+5:302022-07-27T12:22:57+5:30
मुख्यमंत्री शिंदे यांचा निर्णय - शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ‘रिक्षावाला’ म्हणूनही त्यांना हिणवले गेले
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्यभरातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी ‘रिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी मंडळ’ स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी घेतला. याची जबाबदारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार उदय सामंत आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यावर सोपविली असून, त्यांना मंडळाची रूपरेषा तयार करण्यास सांगितले आहे. या मंडळाचा फायदा राज्यातील साडेआठ लाख रिक्षा व १ लाख २० हजार टॅक्सीचालकांना होणार आहे.
शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ‘रिक्षावाला’ म्हणूनही त्यांना हिणवले गेले. शिंदे यांनी आयुष्याच्या सुरुवातीला रिक्षा चालविली होती. त्यानंतर ते राजकारणात आले. मुख्यमंत्रिपदी बसल्यावर रिक्षा व टॅक्सीचालकांसाठी काही करता यावे, या उद्देशाने त्यांनी पावले उचलली आहेत. रिक्षा व टॅक्सीचालकांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न, त्यांच्या मुलांचे शिक्षण, रिक्षा व टॅक्सीचालकांच्या कुटुंबाचे आरोग्य यांसारख्या प्रश्नांची सोडवणूक या मंडळामार्फत केली जाणार आहे.
राज्यातील रिक्षा व टॅक्सीचालकांना रिक्षा-टॅक्सी चालक, मालक कल्याणकारी मंडळाचे सदस्यत्व स्वीकारावे लागेल. या संदर्भातील एक बैठक खासदार डॉ. शिंदे, आमदार सामंत आणि माजी महापौर म्हस्के यांनी घेतली असल्याची माहिती आहे. मंडळाच्या माध्यमातून या बांधवांना अनेक प्रकारची मदत केली जाणार आहे. मुलांच्या शिक्षणासाठी, महिलाच्या प्रसूतीसाठी आर्थिक मदत, ६० वर्षांवरील रिक्षा-टॅक्सी चालकांना पेन्शन योजना, नवीन वाहनासाठी आर्थिक मदत, इन्शुरन्स व रुग्णालय मदत दिली जाणार आहे.
रिक्षा व टॅक्सी चालकांना दिलासा देण्याकरिता तिघांची नियुक्ती केली आहे. आता हे मंडळ कसे असेल त्याची दिशा ठरविली जाणार आहे. तसेच रिक्षा व टॅक्सीचालकांना या माध्यमातून कशी मदत करता येऊ शकते, याचाही अभ्यास केला जाणार आहे.
- नरेश म्हस्के, माजी महापौर