मराठीच्या कलशाची अभिजात घटस्थापना; निवडणुकांच्या तोंडावर मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 06:30 AM2024-10-04T06:30:48+5:302024-10-04T06:31:01+5:30

केंद्र सरकारचा निर्णय; बंगाली, पाली, प्राकृत, आसामी या भाषांनाही दर्जा,अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली.

The classic deconstruction of Marathi's Kalash; A big decision ahead of elections | मराठीच्या कलशाची अभिजात घटस्थापना; निवडणुकांच्या तोंडावर मोठा निर्णय

मराठीच्या कलशाची अभिजात घटस्थापना; निवडणुकांच्या तोंडावर मोठा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : मराठी भाषेसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. त्यामध्ये बंगाली, पाली, प्राकृत, आसामी या भाषांचा समावेश आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी जगभरातील मराठी माणसांकडून अनेक वर्षांपासून होत असलेली मागणी केंद्र सरकारने अखेर मान्य केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत घेतलेला निर्णय ऐतिहासिक स्वरूपाचा आहे, असे केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. सर्व भारतीय भाषांचा वारसा जपण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. भारताचा प्राचीन सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्वाचे काम भाषा करत आहेत, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. अभिजात भाषा अशी नवी वर्गवारी निर्माण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने १२ ऑक्टोबर २००४ साली घेतला होता. 

अभिजात भाषा दर्जासाठी लावले अधिक कठोर निकष
पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमधूनही प्रस्ताव आले होते. त्यानुसार, साहित्य अकादमीच्या अखत्यारीत असलेल्या भाषाशास्त्र तज्ज्ञ समितीने २५ जुलै २०२४ रोजी बैठकीत एकमताने निकषांमध्ये सुधारणा केली. त्यानंतर मराठी व अन्य काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

निवडणुकांत हाेता प्रमुख मुद्दा
महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी हा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी भाषेसंदर्भातील या मागणीचा गेल्या लोकसभा निवडणुकांतही उल्लेख झाला होता, तसेच महाराष्ट्रातील विधानसभेतही हा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जाण्याची शक्यता होती.

मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. 
या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यास असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल.    
- नरेंद्र माेदी, पंतप्रधान

शैक्षणिक, संशोधन क्षेत्रात निर्माण होतील रोजगाराच्या संधी
nकेंद्र सरकारच्या निवेदनात म्हटले आहे की, अभिजात भाषा म्हणून दर्जा दिल्याने त्या भाषेत विशेषत: शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. 
nअभिजात भाषांतील प्राचीन ग्रंथांचे जतन, दस्तऐवजीकरण व डिजिटायझेशन  भाषांतर, प्रकाशन आणि डिजिटल मीडियामध्ये नोकऱ्या निर्माण होतील. 
nअभिजात भाषा दर्जामुळे त्या भाषेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रभाव वाढण्यास मदत होणार आहे. 

अभिनंदन!!!
अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार!
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

अखेर सुदिन अवतरला!
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना व आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यास अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे हातभार लागले. त्यांचाही आभारी आहे. अखेर सुदिन अवतरला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मनाला सुखद अनुभूती देणारा क्षण आहे. 
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Web Title: The classic deconstruction of Marathi's Kalash; A big decision ahead of elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी