मुख्यमंत्री प्रशासन चालवतील, फिरतीलही; चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 06:15 AM2022-09-11T06:15:19+5:302022-09-11T06:15:42+5:30
विश्वासघातामुळे आमचे सरकार आले नव्हते. आता आमचे सरकार आले. त्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले नाही असं मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
कल्याण : राज्यातील प्रशासन सध्या अतिशय व्यवस्थित सुरू आहे. तुम्ही तर घराच्या बाहेरच पडत नव्हता. त्यामुळे सुप्रियाताई म्हणाल्या, दोन-दोन मुख्यमंत्री पाहिजेत. एक प्रशासनाला आणि एक फिरायला. ताई, तुम्ही काळजी करू नका. हे सरकार पण चालवित आहेत, आणि फिरतात पण, असे असा टोला उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.
कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवनदीप शैक्षणिक संस्थेतर्फे परिसरातील कीर्तनकारांचा जाहीर सत्कार शनिवारी करण्यात आला. याप्रसंगी भाजपचे आमदार किसन कथोरे, कुमार आयलानी, माजी आमदार नरेंद्र पवार आणि जीवनदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पाटील म्हणाले की, आमची राज्यात अडीच वर्षे सत्ता नव्हती. विश्वासघातामुळे आमचे सरकार आले नव्हते. आता आमचे सरकार आले. त्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले नाही. जे घडायचे असते ते घडते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे झडपट निर्णय घेणारे आहेत. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी ज्या सामाजिक सुधारणेच्या गोष्टी केल्या. त्यांनी झटपट निर्णय घेऊन समाजाला न्याय दिला. त्याच धर्तीवर आमचे सरकार काम करीत आहे.
‘स्कील डेव्हलपमेंटवर भर द्या’
पाटील पुढे म्हणाले, शिक्षणासोबत स्कील डेव्हलपमेंटवर जीवनदीप काॅलेजने भर दिला पाहिजे. त्यासाठी आम्ही त्यांना निधी देऊ. अतिशय दुर्गम भागात संस्थेचे अध्यक्ष घोडविंदे यांनी शिक्षण संस्था उभी केली. या भागातील विद्यार्थ्यांची गरज पाहता या भागाला विधि महाविद्यालय (लॉ कॉलेज) दिले आहे. ग्रामीण भागात आर्ट्स, सायन्सचे शिक्षण घेऊन काय होणार नाही. ती एक समाजाची छोटी गरज आहे. या विषयांचे ज्ञान आणि त्याला स्कील डेव्हलपमेंटची जोड दिल्यास एका बाजूने तरुण बुद्धिमान होतील. तर दुसऱ्या बाजूने त्याला रोजगार मिळेल.