ठेकेदाराने पैसे थकविले, विधानभवन परिसरात केला आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 07:14 AM2023-07-30T07:14:32+5:302023-07-30T07:15:50+5:30
कंत्राटदारांनी पैसे थकवल्यामुळे कर्जबाजारी झाल्याने खोले यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मुंबई : कल्याण येथील रहिवासी महादेव खोले (४२) यांनी विधानभवन परिसरात विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कंत्राटदारांनी पैसे थकवल्यामुळे कर्जबाजारी झाल्याने खोले यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तक्रारदार राकेश साळुंखे (३३) हे विधानभवन सुरक्षा या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर कर्तव्यास आहेत. त्यांनी मरिन ड्राइव्ह पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलैला सायंकाळी ७.५० च्या सुमारास खोले यांनी त्यांच्याकडे विधानभवन आवारात जाण्याची परवानगी मागितिली.
मात्र, पास नसल्याने साळुंखे यांनी खोलेंना परवानगी नाकारली. त्यामुळे खोले यांनी तिथेच बसकण मारून हातात असलेली पांढऱ्या रंगाची छोटी बाटली दाखवून ‘यातील औषध मी प्यायलो आहे,’ असे सांगितले. साळुंखे यांना संशय आला. त्यांनी त्याच्या हातातली बाटली व पिशवी काढून घेतली. उषा मेहता चौकातील मरिन ड्राइव्ह मोबाइल १ वरील सहकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यामुळे खोले यांना वेळीच उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल केले.
खोले यांच्या पिशवीत सापडलेल्या कागदपत्रांत कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करीत असल्याची सुसाइड नोट पोलिसांना सापडली. दरम्यान, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खोलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
- डॉ. प्रवीण मुंडे, उपायुक्त, परिमंडळ १