ज्येष्ठांसाठी मदतीची ‘काठी’; महामंडळ झाले स्थापन; दीड कोटी वृद्धांना सरकार देणार सहाय्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 09:10 AM2024-09-13T09:10:17+5:302024-09-13T09:10:43+5:30
ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या योजना राबविताना निधीची अडचण येऊ नये यासाठी स्वतंत्र निधी उभारण्यात येईल.
मुंबई - राज्यातील साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना गुरुवारी करण्यात आली. १ कोटी ५० लाख ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांच्या जीवित व मालमत्तेचे रक्षण, छळ, पिळवणुकीपासून त्यांचे संरक्षण आणि त्यांना निवारा पुरविणे आणि विमा कवच देणे ही महामंडळाची उद्दिष्टे असतील.
राज्य मंत्रिमंडळाच्या २५ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत या महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय झाला होता. त्याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने आता काढला आहे. महामंडळाचे मुख्यालय मुंबईत असेल. विद्यमान वा निवृत्त सनदी अधिकारी हे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक असतील. ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठीच्या सर्व योजना एका छताखाली आणून त्यांचा लाभ मिळवून देण्याचे काम हे महामंडळ करेल. ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या योजना राबविताना निधीची अडचण येऊ नये यासाठी स्वतंत्र निधी उभारण्यात येईल. सुरुवातीला महामंडळाचे भागभांडवल हे ५० कोटी रुपये असेल. वृद्धाश्रमांच्या संदर्भात एकात्मिक धोरण हे महामंडळ तयार करेल.
...अशा आहेत कल्याणकारी योजना
महायुती सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी काही महत्त्वाचे निर्णय आधीच घेतले आहेत. बीपीएलमधील ज्येष्ठ नागरिकांना तीन योजनांमध्ये पूर्वी मासिक ६०० रुपये दिले जात असत. आता १५०० रुपये मासिक दिले जातात. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ६० वर्षे वयावरील सर्व नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमाकवच दिले आहे. या योजनेच्या राज्य व जिल्हा संनियंत्रण समितीवर ज्येष्ठ नागरिकांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष स्थापन करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांनी दिले आहेत. मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेल्पलाइन येणार
ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांसाठी हेल्पलाइन तयार केली जाईल. ज्येष्ठ नागरिकांना ताणतणावाचा सामना करण्यासाठी सक्षम केले जाईल. त्यांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचीही काळजी घेतली जाणार आहे. वैद्यकीय महाविद्यालये, संशोधन संस्था व बिगर सरकारी संस्थांच्या मदतीने ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या समस्यांसंबंधी अभ्यास केला जाईल. त्याआधारे ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या योजना व उपक्रम राबविले जातील.