देशातील श्रीमंत बांधकाम व्यावसायिक शिंदे सरकारचे बनले मंत्री; भाजपानं दिली संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 11:14 AM2022-08-09T11:14:50+5:302022-08-09T11:15:43+5:30
त्यात आज राज्याचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. त्यात भाजपाचे ९ आणि शिंदे गटाच्या ९ जणांना संधी देण्यात आली आहे.
मुंबई - गेल्या महिनाभरापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर मार्गी लागला आहे. ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर ३८ दिवस झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. महिनाभरात ६ हून अधिक वेळा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी झाली तरीही विस्तार होत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले होते.
त्यात आज राज्याचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. त्यात भाजपाचे ९ आणि शिंदे गटाच्या ९ जणांना संधी देण्यात आली आहे. भाजपाकडून देशातील श्रीमंत बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळखले जाणारे मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे. लोढा यांच्याकडे मुंबई भाजपा अध्यक्षपदाची धुरा होती. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पहिल्या टप्प्यात लोढा यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.
कोण आहेत मंगलप्रभात लोढा?
मंगलप्रभात लोढा हे स्वातंत्र्य सैनिक आणि निवृत्त न्यायाधीश गुमान माल लोढा यांचे सुपूत्र असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम सुरू केले. मलबार हिल मतदारसंघाचे ते भाजपा आमदार आहेत. १९९५ पासून सलग ते या मतदारसंघातून निवडून येत आहेत. देशातील नामवंत श्रीमंत बिल्डरांमध्ये लोढा यांचे नाव घेतले जाते.
लोढा यांनी राजस्थानात एलएलबीचं शिक्षण घेतले. त्यानंतर वकिली सुरू केली. परंतु न्यायालयात वडील न्यायाधीश असल्याने त्यांनी वकिली सोडत थेट मुंबईत गाठली. याठिकाणी एका खासगी रिअल इस्टेटमध्ये नोकरी केली. ४ वर्ष फर्ममध्ये काम केल्यानंतर बिल्डिंगला लागणारं मटेरिअल पुरवण्याचं काम त्यांनी केले. १९८२ मध्ये एका मित्राच्या मदतीने नालासोपारा इथे जमीन खरेदीविक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि याच व्यवसायात त्यांनी जम बसवला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून भाजपापर्यंत त्यांचा राजकीय प्रवास घडला. रथयात्रेवेळी त्यांना अटकही झाली होती. १९९५ मध्ये मलबार हिल मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली. तेव्हा तत्कालीन नगरविकास मंत्री बी.एस देसाई यांना हरवून ते जायंट किलर ठरले होते.