छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा ‘दांडपट्टा’ राज्य शस्त्र म्हणून घोषित

By राजेश भोजेकर | Published: February 21, 2024 11:27 AM2024-02-21T11:27:12+5:302024-02-21T11:28:51+5:30

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची आग्रा किल्ल्यामधून घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी

The 'Dandapatta' of Chhatrapati Shivaji Maharaj's maws was declared as the state weapon | छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा ‘दांडपट्टा’ राज्य शस्त्र म्हणून घोषित

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा ‘दांडपट्टा’ राज्य शस्त्र म्हणून घोषित

चंद्रपूर : ज्या किल्ल्यावरून क्रूर, अत्याचारी, जुलमी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न उधळून टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, त्याच आग्रा येथील किल्ल्याच्या दिवाण-ए-खासमधून महाराजांच्या आणि मावळ्यांच्या पराक्रमाचे प्रतिक असलेला दांडपट्टा 'राज्यशस्त्र ' म्हणून घोषित करण्यात आला. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा करताना अभिमानाने उर भरून येत असल्याची भावना व्यक्त केली.

आग्रा येथील किल्ल्यामध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हर हर महादेव’चा जयघोष करीत अतिशय दिमाखात शिवजयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री एस. पी. बघेल, खासदार, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेते मंगेश देसाई, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, विनोद पाटील, विद्याधर पवार, आस्तिक पांडे, गायक नितीन सरकटे आदी मान्यवर उपस्थित होते. 

छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी दांडपट्टा या शस्त्राला ‘राज्यशस्त्र’ म्हणून मान्यता देण्यात येत असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी दांडपट्टा पूजनही करण्यात आले. ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राज्य स्थापन करण्यासाठी आयुष्यभर जगले. त्यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करताना आपण केवळ स्मरण करत नाही, तर भूतकाळातील शौर्यामधून वर्तमानात गौरवशाली भविष्य घडविण्याची ऊर्जा देखील प्राप्त करतो. महाराजांचा विचार घेऊन सर्व विचार, पक्ष, जाती-धर्माच्या लोकांनी रयतेचे राज्य निर्माण करण्याचा संकल्प करायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातच हजारो कोटी सूर्यांची ऊर्जा आहे. त्यामुळेच आपल्याकडे महाराजांच्या कथा लहान मुलांना सांगितल्या जातात, पाश्चिमात्य देशांप्रमाणे स्पायडरमॅन किंवा सुपरमॅन सारख्या काल्पनिक पात्रांच्या कथा सांगितल्या जात नाहीत.’ आग्रा येथील किल्ल्याच्या भिंतींना बोलता आले असते तर त्यांनी देखील ‘जय भवानी जय शिवाजी’ असा जयघोष केला असता, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.

 अशा जयंती सोहळ्यांमधून शिवाजी महाराजांप्रमाणेच पराक्रम गाजवण्याची प्रेरणा आपल्याला मिळते असे सांगत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री बघेल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराज फक्त राज्यापुरता मर्यादित नव्हते तर ते देशाचे नेतृत्व होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण भारतातून शिवभक्त या शिवजयंतीसाठी आग्र्यात दाखल झाले होते. आग्रा किल्ल्याबाहेर देखील हजारो शिवभक्तांनी हा सोहळा एलईडी स्क्रीनवर लाईव्ह पाहिला. अजिंक्य देवगिरी फाउंडेशन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सरकटे बंधूंनी महाराष्ट्र गीत, छत्रपती शिवाजी महाराज गीत सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा पराक्रमावर लेझर शो, सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. 'महाराष्ट्र राज्याचे चलन' या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. 
 
रोमांचकारी क्षण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ज्या आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमान डिवचला गेला त्याच आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती थाटामाटात साजरी होणे हा रोमांचकारी क्षण असल्याची भावना मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. आग्रा किल्ल्यात दरवर्षी शिवजयंती साजरी होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आयोजनाबद्दल अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले.

‘स्वराज्य सर्किट’ होणार

छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्यासाठी ‘ज्योतिर्लिंग सर्किट’च्या धर्तीवर ‘स्वराज्य सर्किट’ची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. स्वराज्य सर्किटची निर्मिती करावी अशी मागणी खासदार श्रीमंत छञपती उदयनराजे भोसले यांनी याच शिवजयंती सोहळ्यात बोलताना व्यक्त केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी लगेच प्रतिसाद देत, गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करण्याची ग्वाही दिली. 

असा आहे दांडपट्टा

मराठा शस्त्रांमध्ये ढाल-तलवार, पट्टा, भाला, कट्यार, वाघनखे, धनुष्यबाण, ठासणीच्या बंदुका व तोफा यांचा समावेश होता. या शस्त्रांमध्ये समावेश असलेला पट्टा म्हणजेच सर्वसाधारण भाषेत ज्याला दांडपट्टा असे म्हटले जाते ते एक वैशिष्ट्यपूर्ण शस्त्र आहे. सरळ लांब दुधारी पाते व त्यास पकडण्यासाठी असलेला खोळबा म्हणजे संपूर्ण कोपरापर्यंतचा हात धातूच्या आच्छादनाने झाकला जाईल, अशी मुठ असणारे शस्त्र म्हणजे पट्टा होय, असा उल्लेख राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने जाहीर केलेल्या शासन निर्णयात आहे. 

शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षाचे औचित्य

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमित्त ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये दांडपट्ट्याला राज्य शस्त्र घोषित करणे हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच मावळ्यांनी लढायांमध्ये वापरलेला पट्टा अर्थात दांडपट्टा महाराष्ट्राच्या चिरंतन स्मृतींमध्ये राहावा, यासाठी या शस्त्राला ‘राज्य शस्त्र’ म्हणून घोषित करण्यात येत आहे,’ असे निर्णयात नमूद आहे. शासन निर्णयात दांडपट्ट्याचे ऐतिसाहिक महत्त्व व वापर दोन्हींचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे.

Web Title: The 'Dandapatta' of Chhatrapati Shivaji Maharaj's maws was declared as the state weapon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.