आज उदास उदास, दूर...; ना.धों. महानोरांच्या निधनाने केवळ मराठी काव्यसृष्टीच हळहळली नाही, तर... 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 07:16 AM2023-08-04T07:16:46+5:302023-08-04T07:19:33+5:30

पळसखेड्याची गाणी हयातभर गाणाऱ्या महानोरांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी त्यांच्या मूळगावी पळसखेडे (जि. औरंगाबाद) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.  

The death of ND Mahanora not only sad Marathi poetry, but The green nature that blossomed from the forest was sad from within | आज उदास उदास, दूर...; ना.धों. महानोरांच्या निधनाने केवळ मराठी काव्यसृष्टीच हळहळली नाही, तर... 

आज उदास उदास, दूर...; ना.धों. महानोरांच्या निधनाने केवळ मराठी काव्यसृष्टीच हळहळली नाही, तर... 

googlenewsNext

घेऊन... रानात गुंतलेले प्राण अवचित रानामध्येच हरपावेत तसे मराठी कवितेतले हिरव्या बोलीचे शब्द अचानक अबोल झाले. निसर्गावर भरभरून प्रेम करणारा, काळ्या मातीच्याच शब्दगंधात बेहोषून जाणारा रानकवी दिगंताच्या प्रवासाला निघून गेला. कविवर्य ना.धों. महानोरांच्या निधनाने केवळ मराठी काव्यसृष्टीच हळहळली असं नाही तर रानारानातून बहरलेला हिरवा निसर्गच आतून आतून गलबलून गेला. पुण्यातल्या एका खासगी रुग्णालयात वयाच्या ८० व्या वर्षी महानोरांनी अखेरचा श्वास घेतला. पळसखेड्याची गाणी हयातभर गाणाऱ्या महानोरांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी त्यांच्या मूळगावी पळसखेडे (जि. औरंगाबाद) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.  

शेतकऱ्यांचे सुखदुःख शब्दाशब्दांतून पेरणाऱ्या महानोरांच्या रानातल्या कविता लोकलयीतून आलेल्या आणि त्यामुळेच सर्वसामान्य रसिकांच्या ओठांवर सहजपणे रेंगाळणाऱ्या... कधी त्या पावसाळी कविता म्हणून भेटतात तर कधी वही बनून निसर्गाची विविध रूपं मोरपिसासारख्या हृदयाच्या खोल कप्प्यातून फुलारत राहतात. कधी आकाशीचे पक्ष्यांचे लक्ष थवे पाहत दयाघनाला प्रार्थना करतात, तर कधी पानझडीचे शल्य मांडताना तिची कहाणी सांगत राहतात. लोकसंस्कृतीचा निखळ प्रवाह महानोरांच्या कवितांमधून वाहत राहिला आणि त्यात मराठी रसिकमन आबादानी होत राहिले. पण, सहजसुंदर या कवितांचा अचानक थांबलेला हा प्रवास रसिकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. महानोरांच्या शब्दांत सांगायचे तर...  

रसिकांचे उदास झालेले मन जणू काही महानोरांच्या याच ओळी आठवत असेल... 
दूरच्या रानाला लागीर उन्हाला
पारंबीचा झुला गेला झुलत नभाला...
आज उदास उदास दूर पांगल्या सावल्या
एकान्ताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या
काही केल्या करमेना, 
कसा जीवच लागेना
बोलघेवडी साळुंकी आज शब्दही बोलेना.... 

शेतकऱ्यांच्या व्यथा वेदनांचा आवाज
जोंधळ्याला चांदणे लगडून यावे, असे म्हणणारे महानोर निव्वळ कवीच नव्हते तर हाडामांसाचे शेतकरी होते. म्हणूनच तर शेतकऱ्यांच्या व्यथा वेदनांचा आवाज त्यांनी जसा रसिकांच्या दरबारात पोहोचवला तसाच तो शासनदरबारीही पोहोचवला. दोन वेळा विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून त्यांनी विधिमंडळाच्या सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. 

हे खेडे अंधाराचे, हे खेडे प्रकाशाचे जन्मोजन्मी लक्तरलेले, दुःख घेऊन चालत आले... 
असे म्हणत त्यांनी खेड्यापाड्यांतील शेतकऱ्यांचे वास्तव सातत्याने मांडले. महानोरांना या शेतानेच असा काही लळा लावला की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो म्हणत त्यांचा जीवच जखडला आणि रानाच्या हिरव्या बोलीचा शब्द होऊन गेला. या हिरव्या बोलीनेच मराठी रसिकांच्या काव्यजाणिवा साठोत्तरी काळात प्रगल्भ होत गेल्या. आज ही बोली शांतावली असली तरी अक्षरे चुरगाळून अमृताचे कुंभ प्यायलेली महानोरांची कविता रसिकांच्या सोबत असेल.
 

Web Title: The death of ND Mahanora not only sad Marathi poetry, but The green nature that blossomed from the forest was sad from within

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.