"मी मुख्यमंत्री होणार नाही हे पहिल्या दिवसापासून माहित होतं, पण शेवटच्या क्षणी..."
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 03:26 PM2023-01-24T15:26:50+5:302023-01-24T15:27:12+5:30
मूळात बाळासाहेब ठाकरे ही उद्धव यांची खासगी मालमत्ता नाही. बाळासाहेब ठाकरे मालमत्ता असतील तर ती शिवसेनेची, महाराष्ट्राची आहे असं फडणवीस म्हणाले.
मुंबई - राज्यात सहा महिन्यापूर्वी सत्तांतर घडले. त्यात अनपेक्षितपणे मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. मात्र मला पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री होणार नाही हे माहिती होते. मुख्यमंत्री न होण्याचा निर्णय माझाचा होता असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. एका मुलाखतीत उत्तर देताना फडणवीसांनी हा गौप्यस्फोट केला आहे. त्याचसोबत त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला पहिल्या दिवशीपासून मी मुख्यमंत्री होणार नाही हे माहिती होते. पण मला शेवटच्या क्षणी उपमुख्यमंत्री होणार आहे हे कळालं. रणनीतीसाठी हे करेक्ट होतं मी मुख्यमंत्री न बनणे. मुख्यमंत्री न बनणे हा १०० टक्के माझा निर्णय होता. हा निर्णय जेव्हा मी वरच्यांना कळवला तेव्हा त्यांच्याकडून होकार येण्यासाठी काही काळ लागला असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत उद्धव ठाकरेंशी माझे आजही वैर नाही. पण मातोश्रीचे दरवाजे माझ्याकरिता त्यांनी बंद केलेत. माझा फोनदेखील त्यांनी घेतला नाही. ५ वर्ष आपण ज्यांच्यासोबत काम करतो. सरकार चालवतो. सौजन्य म्हणून किमान फोन घेऊन तुमच्यासोबत यायचं नाही हे सांगू शकता. पण तुम्ही मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी बंद केले हे दुख: आहे अशी खंतही देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवली.
दरम्यान, २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींचे मोठे फोटो लावून ते निवडून आले. बाळासाहेब आमचे नेतेच आहेतच. पण त्यांच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा छोटा फोटो, बाळासाहेबांचा तुलनेने मोठा फोटो आणि मोदींचा मोठा फोटो लावून ते निवडून आलेत. त्यामुळे आता कसलं चॅलेंज देता? मूळात बाळासाहेब ठाकरे ही उद्धव यांची खासगी मालमत्ता नाही. बाळासाहेब ठाकरे मालमत्ता असतील तर ती शिवसेनेची, महाराष्ट्राची आहे. शिवसेना हीदेखील त्यांची खासगी मालमत्ता नाही. त्यामुळे ८० टक्के शिवसेना आणि शिवसैनिक एकनाथ शिंदेसोबत आलेत. खरी शिवसेना ती आहे. त्यामुळे शिवसेनेची मालकी नव्हे तर वारसा शिंदेंसोबत आहे असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला.