महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, सीमावासीयांना दिले आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 11:15 AM2023-02-15T11:15:34+5:302023-02-15T11:16:58+5:30
सीमाप्रश्नी खटल्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली
प्रकाश बेळगोजी
बेळगाव/मुंबई: बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी सीमावासीयांसाठी काही महत्वपूर्ण घोषणा केल्या होत्या. या घोषणांची अंमलबजावणी अद्याप करण्यात आली नसल्याची बाब समितीने निदर्शनात आणून दिली. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरच सरकारी आदेश पाठवून घोषणांची अंमलबजावणी होईल, असे आश्वासन दिले.
याचप्रमाणे अंतिम टप्प्यात असलेल्या सीमाप्रश्नी खटल्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली याचिका अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र अजूनही सुनावणीच्या तारखा पुढे ढकलण्यात येत आहेत. महाराष्ट्राने सीमाप्रश्नी सातत्याने कर्नाटकाच्या मंत्र्यांप्रमाणे पाठपुरावा करावा, सीमाप्रश्नी महाराष्ट्र-कर्नाटकातील न्यायाधीश कामकाजात सहभाग घेणार नाहीत, यासाठी शिफारस करावी अशा मागण्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या.
याचप्रमाणे फोल ठरत असलेल्या सिमकक्षाविषयीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. सिमकक्षात कर्मचाऱ्यांची कमी असून सीमाप्रश्नाविषयी अभ्यास करणाऱ्या आणि कामकाज पाहणाऱ्या व्यक्तीची ऐनवेळी बदली होते. सीमासमन्वय मंत्री बाजू सांभाळण्यात कमी पडतात. यामुळे कर्मचाऱ्यांची नियुक्ती, कायमस्वरूपी काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, वकील आणि सीमा समन्वय मंत्र्यांची बैठक घेण्यात यावी, जेणेकरून सीमाप्रश्नी कोणत्याही गोष्टीत महाराष्ट्राची बाजू कमकुवत राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा मागण्याही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या.
येत्या २८ फेब्रुवारी रोजी छेडण्यात आलेल्या आंदोलांसंदर्भातदेखील चर्चा करण्यात आली असून या आंदोलनासाठी अनेक मंत्री उपस्थित राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. याचप्रमाणे या आंदोलनास आपण देखील उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
यावेळी मंत्री शंभूराजे देसाई, सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार आणि समिती नेते मनोहर किणेकर, विकास कलघटगी, प्रकाश मरगाळे आदी उपस्थित होते.