देशी गाय आता ‘राज्यमाता-गोमाता’; मंत्रिमंडळाचा निर्णय : लगेच आदेशही जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 07:17 AM2024-10-01T07:17:38+5:302024-10-01T07:18:07+5:30
गायींचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना कामधेनू असे म्हटले जाते. राज्यातील विविध भागांत विविध प्रकारच्या देशी गायी आढळतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान आणि देशी गायींची एकूणच उपयुक्तता लक्षात घेऊन त्यांना यापुढे राज्यमाता-गोमाता असे म्हटले जाईल, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. लगेच त्या संबंधीचा शासन निर्णय (जीआर) राज्य सरकारने काढला.
गायींचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना कामधेनू असे म्हटले जाते. राज्यातील विविध भागांत विविध प्रकारच्या देशी गायी आढळतात. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी, विदर्भात गवळाऊ देशी गायी आहेत. राज्यातील सर्वच देशी गायींना राज्यमाता-गोमाता असे आता संबोधण्यात येणार आहे. प्रदेश भाजपने निर्णयाचे स्वागत केले आहे.
दोन तासांत ३८ निर्णय
nमागील आठवड्यात मंत्रीमंडळ बैठकीत ३५ निर्णय झाले होते.
nसोमवारच्या कार्यक्रम पत्रिकेवर ७ विषय होते, मात्र आयत्या वेळी ३६ विषय आणून अवघ्या दोन तासांत ३८ निर्णय घेण्यात आले.
nकोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. ग्राम रोजगार सेवकांना दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान, होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ करण्याचेही निर्णय घेण्यात आले.
का घेतला निर्णय?
पशुसंवर्धन विभागाच्या निर्णयात म्हटले आहे, की गायींचे वैदिक काळापासून एक स्थान आहे.
या गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पद्धती, पंचगव्य उपचार पद्धती तसेच देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे सेंद्रिय शेती पद्धतीत असलेले महत्त्वाचे स्थान विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
गोशाळांना अनुदान
गोशाळांमधील देशी गाईंच्या पालन पोषणासाठी प्रति दिवस प्रति गाय ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळांने घेतला. गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने आर्थिक अडचणी येतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून करण्यात येईल.