दोघांच्या हिंदुत्वात जमीन-अस्मानाचा फरक; शिवसेनेचा मतदार भाजप पळवू शकेल?
By संदीप प्रधान | Published: February 20, 2023 06:55 AM2023-02-20T06:55:32+5:302023-02-20T06:56:11+5:30
भाजपचे हिंदुत्व वैचारिक अधिष्ठान असलेले आहे तर शिवसेनेचे हिंदुत्व हे झुलीसारखे पांघरलेले असल्याने वरवरचे व लवचिक आहे.
भारतीय जनता पार्टीकडे महाराष्ट्रात २७ ते २९ टक्के मते असून लोकसभेच्या ४५ तर विधानसभेच्या २०० जागा जिंकण्याचे पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत निश्चित केलेले लक्ष्य गाठायचे तर भाजपला आपल्या मतांची टक्केवारी ४५ टक्क्यांपर्यंत वाढवावी लागेल. याचा अर्थ भाजपला आपल्या मतांच्या टक्केवारीत १७ ते १९ टक्के वाढ करायला हवी. २०१९ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावून मते मिळवली व भाजपला टांग दिली. ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेली १९ टक्के हिंदू मते भाजपकडे खेचून आणण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. मात्र शिवसेनेचे व भाजपचे हिंदुत्व व दोन्ही पक्षांचा हिंदुत्ववादी मतदार यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे.
ठाण्यातील नौपाड्यातील भाजपचा मतदार आणि कोपरीतील शिवसेनेचा मतदार किंवा घोडबंदर रोडवरील भाजपचा मतदार आणि कळव्यातील शिवसेनेचा मतदार यात केवळ फरक नाही तर काही प्रमाणात संघर्ष आहे. हा संघर्ष हीच ठाण्याच्या तसेच अन्य शहरांमध्ये शिवसेनेची व्होटबँक ताब्यात घेण्यातील अडसर आहे. केवळ मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना व्यापक जनाधार प्राप्त करून सत्ताधारी होणार नाही हे जेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हेरले तेव्हा त्यांनी हिंदुत्वाची झूल शिवसेनेवर चढवली. आपण हिंदुत्ववादी नेते असल्याचे जनमानसावर ठसवण्याकरिता ठाकरे यांनी भगवी वस्त्रे परिधान केली, हातात रुद्राक्षाच्या माळा घेतल्या. बाळासाहेब हे व्यंगचित्रकार असल्याने त्यांचा टायमिंग सेन्स जबरदस्त होता. बाबरी पडल्यावर ती शिवसैनिकांनी पाडल्याचा दावा करून त्यांनी भाजपच्या मंडळींचा हातातोंडाशी आलेला घास हिसकावला.
भाजपचे हिंदुत्व वैचारिक अधिष्ठान असलेले आहे तर शिवसेनेचे हिंदुत्व हे झुलीसारखे पांघरलेले असल्याने वरवरचे व लवचिक आहे. त्याचाच राजकीय फायदा उद्धव ठाकरे यांनी मविआ स्थापन करताना उठवला. शिवसेनेचा हिंदुत्ववादी मतदार हा नोकरदार आहे. भाजपचा मतदार असलेल्या धनाढ्य व्यक्तींकडे तो कामाला आहे किंवा उच्चशिक्षित व्यक्तींच्या हाताखाली काम करीत आहे. आर्थिक, सामाजिक पातळीवर किंवा अगदी खाण्यापिण्याच्या सवयींवरूनही या दोन मतदारांमध्ये दीर्घकालीन संघर्ष आहे. त्यामुळे ठाण्यात नौपाड्यातील भाजप मतदारांच्याबरोबरच कोपरीतील शिवसेनेच्या मतदाराला आपल्याकडे वळवून ४५ खासदार निवडून आणणे हे निश्चित आव्हान आहे.
भाजपचा हिंदुत्ववादी मतदार आणि शिवसेनेचा हिंदुत्ववादी मतदार यात मोठा फरक आहे. भाजपचा पूर्वापार मतदार हा धनाढ्य, उच्च जातीचा व उच्चशिक्षित आहे. शिवसेनेचा हिंदुत्ववादी मतदार हा मध्यमवर्गीय व कनिष्ठ मध्यमवर्गीय आहे. वेगवेगळ्या समस्यांनी घेरलेल्या या मतदाराला स्वत:च्या समाधानाकरता, आनंदाकरता सत्यनारायणाची पूजा घालावी, कर्मकांड करावे, असे वाटते. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या व्यसनाधीनतेवर, आर्थिक विवंचनावर मात करण्याकरिता संत, महापुरुष यांचा आधार घ्यावा असे वाटते.