आजच्या निर्णायक बैठकीत ठरेल मराठा आंदोलनाची दिशा; अनेक बाबी उघड करणार- जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 06:11 AM2024-02-25T06:11:27+5:302024-02-25T06:11:40+5:30
कितीही प्रयत्न केले तरी आपण सगेसोयऱ्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री (जि. जालना) : दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला हरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी वेगवेगळे डाव आखले जात आहेत. रात्रीतून निर्णय बदलले जात आहेत. कितीही प्रयत्न केले तरी आपण सगेसोयऱ्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार नाही. त्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी (२५ फेब्रुवारी) दुपारी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची अंतिम आणि निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक बाबी समाजासमोर आपण उघड करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी दिला.
ते म्हणाले, सगेसोयऱ्याची अधिसूचना काढली. परंतु, निर्णय घ्यायला आणि आंदोलनाकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही. पूर्वी एकच राजा असल्यामुळे न्याय मिळायचा. आता तीन-तीन राजे असल्याने न्याय मिळणे अवघड दिसत आहे. त्यामुळे समाजबांधवांची अंतिम आणि निर्णायक बैठक घेत आहोत.
सगेसोयरे हरकतींवर अद्याप निर्णय का नाही?
परवाच्या रात्री आणि कालच्या दिवसात खूप काही घडले. ते सर्व समाजाला सांगायचे आहे. अध्यादेश शासनाने काढला, त्यांनाच अंमलबजावणी करावी लागणार आहे.
आमच्यावर १० टक्के आरक्षण का थोपवत आहात? सगेसोयरे अधिसूचनेवर आलेल्या हरकतींवर अद्याप निर्णय नाही. अशी कोणती छाननी सुरू आहे, असा सवालही जरांगे-पाटील यांनी उपस्थित केला.
देहू संस्थान जरांगेंच्या पाठीशी
पिंपरी : मनोज जरांगे-पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय बारस्कर यांचा देहू आणि देहू संस्थानशी संबंध नाही, असा खुलासा शनिवारी देहू संस्थानने केला. देहू संस्थान जरांगे-पाटील यांच्या पाठीशी असल्याचेही सांगण्यात आले. लोणावळ्याजवळ रास्ता रोकोनंतर मावळमधील मराठा आंदोलक देहूतील संत तुकाराम महाराजांच्या वंशजांना भेटण्यासाठी गेले होते.