जागावाटपाची चर्चा अपुरीच, उद्धव ठाकरेंनी दोन जागांवर उमेदवार दिले; वडेट्टीवारांचा आंबेडकरांवरही संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 01:34 PM2024-03-27T13:34:40+5:302024-03-27T13:35:21+5:30
Vijay Vadettiwar on Prakash Ambedkar, Uddhav Thacekray List: महाविकास आघाडीत जागावाटपावरून बिनसल्याची ही नांदी आहे. एकमेकांच्या जागांवर या पक्षांनी दावे ठोकले होते. यामुळे जागावाटपाचा तिढा पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आला तरी सुटला नव्हता.
देशात इंडिया आघाडी विस्कळीत झाली तशीच राज्यातही महाविकास आघाडी विखुरल्यात जमा आहे. उद्धव ठाकरे गटानंतर वंचितने ९ उमेदवारांची याची जाहीर केल्याने मविआतील नेते बिथरले आहेत. जागावाटपावर अंतिम निर्णय झालेला नसताना उद्धव ठाकरेंनी परस्पर यादी जाहीर करत आघाडी धर्माला गालबोट लावल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
महाविकास आघाडीत जागावाटपावरून बिनसल्याची ही नांदी आहे. एकमेकांच्या जागांवर या पक्षांनी दावे ठोकले होते. यामुळे जागावाटपाचा तिढा पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आला तरी सुटला नव्हता. काँग्रेस दोन जागा सोडत नाही हे पाहून ठाकरे गटाने आज सकाळी परस्पर १७ जागांवर उमेदवार जाहीर करून टाकले आहेत. यापैकी दोन जागांवर काँग्रेसने दावा केलेला होता. यावरून आता काँग्रेस नेते नाराजी व्यक्त करू लागले आहेत.
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा अंतिम निर्णय होणे बाकी असताना उद्धव ठाकरे यांनी दोन जागांवर उमेदवार जाहीर केले. आघाडी धर्म पाळला असता तर बरे झाले असते. चर्चा सुरू असताना उमेदवार घोषित करणे यामुळे आघाडी धर्माला गालबोट लागले, यावर त्यांनी पुनर्विचार करावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
तसेच प्रकाश आंबेडकर यांना ४ वरून अजून एखादी जागा वाढवून देता आली असती. ज्यावेळी पुरोगामी मतांचे विभाजन होते, त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपाला होतोच. आंबेडकरांनी हुकुमशाही विरोधी लढाईमध्ये मविआ कमजोर होण्यासाठी हा निर्णय घेतला का हा देखील विचार करण्य़ासारखा प्रश्न आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत.