पोलीस होण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं; धावता धावता तिने घेतला जगाचा निरोप
By रवी दामोदर | Published: August 24, 2022 10:36 PM2022-08-24T22:36:40+5:302022-08-24T22:38:19+5:30
धोतडी येथील रोशनी वानखडे ही रनिंगचा सराव करण्यासाठी शहरातील वसंत देसाई क्रीडा संकुलच्या मैदानावर आली होती
अकोला: शहरातील स्व. वसंत देसाई क्रीडा संकुलवर ग्रामीण भागातील अनेक युवक पोलीस भरती तसेच आर्मी भरतीचा सराव करण्यासाठी रनिंगसाठी येतात. अशाच प्रकारे पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून धोतर्डी येथून आलेल्या एका मुलीचा धावताना चक्कर येऊन खाली कोसळून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
धोतडी येथील रोशनी वानखडे ही रनिंगचा सराव करण्यासाठी शहरातील वसंत देसाई क्रीडा संकुलच्या मैदानावर आली होती. सायंकाळच्या सुमारास सराव करताना ती चक्कर आल्याने खाली कोसळली. ही बाब तिच्या मित्र-मैत्रिणींच्या लक्षात येताच त्यांनी तिला तत्काळ शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यासाठी हलविले. तिथे मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या मागे आई एक भाऊ व एक बहीण असा आप्त परिवार आहे गत काही दिवसांपासून ती अकोला शहरातील रहिवासी असलेल्या मोठ्या बहिणीकडे राहत होती व तेथूनच ते पोलीस भरतीच्या तयारीसाठी वसंत देसाई स्टेडियमवर सरावा करिता जात होती, अशी माहिती आहे.
दोन्ही भावंडे करीत होते सराव
रोशनी व तिचा भाऊ हे दोन्ही भावंडे पोलीस भरतीच्या प्रक्रियेसाठी सराव करीत होते दररोज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास वसंत देसाई स्टेडियम वर जाऊन रनिंगची प्रॅक्टिस करीत होते; मात्र आज रोशनी साडेचार वाजताच निघून गेली होती.
वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
गट आठ ते दहा वर्षांपूर्वी रोशनीचे वडील अनिल वानखडे यांना सुद्धा शेतात हृदयविकाराच्या झटका आल्याने मृत्यू झाला होता. आता रोशनीचा आकस्मिक मृत्यू झाल्याने गावात सर्वत्र हळहळ होत आहे.