इतिहास बदलण्याची ताकद एकनाथ शिंदे गटात नाही; शिवसेना खा. संजय राऊतांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 10:41 AM2022-07-16T10:41:29+5:302022-07-16T10:42:56+5:30
शिवसेनेची ताकद आम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय खळबळ माजली आहे हे माहिती आहे. शिवसेना सोडली ते राजकारणातून हद्दपार झाले आहेत असं संजय राऊत म्हणाले.
मुंबई - ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणातून हद्दपार झाले. हा इतिहास बदलण्याची ताकद शिंदे गटात नाही. ज्यांना भाजपाचा पुळका होता ते पराभूत झाले. शिंदे-भाजपा सरकारला लोकशाहीची भीती आहे. बंडखोरांनी राजकीय आत्महत्या केली आहे. त्यांचा राजकीय अंत लवकरच होईल अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना फटकारलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, बेईमान शेवटपर्यंत सांगतो मी बेईमान आहे. तुम्ही शिवसेना सोडली आहे. शिवसेनेचा वापर करून माधुकरी मागू नका. स्वत:च्या हिमतीवर निवडून या. तुम्ही तुमचा स्वतंत्र पक्ष स्थापन करा. शिवसेनेच्या पंखाखाली का येताय? जर स्वाभिमानासाठी बाहेर पडलाय तर शिवसेनेशिवाय स्वतंत्र्य स्थान निर्माण करा. शिवसेनेचा गैरवापर करू नका. ज्यांची हकालपट्टी करण्यात आली ते शिवसेना-भाजपा युती असताना पराभूत झाले आहेत त्यांना आता भाजपाचा पुळका आला आहे असा टोला राऊतांनी लगावला.
तसेच बंडखोरांच्या नेत्यांना असे बोलावे लागते. शिवसेनेची ताकद आम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय खळबळ माजली आहे हे माहिती आहे. शिवसेना सोडली ते राजकारणातून हद्दपार झाले आहेत. हे सरकार बेकायदेशीर आहे. इतके दिवस मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकत नाही. एक दुजे के लिए असा सिनेमा राजकारणात सुरू आहे. त्या सिनेमाचा शेवट कसा झाला सगळ्यांना माहिती आहे असंही संजय राऊत म्हणाले.
संसदीय लोकशाहीवर हल्ला
संसदीय लोकशाहीवर हल्ला केला जात आहे. लोकशाहीची भीती सरकारला वाटत असेल तर ते देशासाठी घातक आहे. संसदेत परखड शब्दात बोलण्यावर बंदी आणली जात आहे. जर मुस्कुटदाबी करणार असेल तर देशात लोकशाही आहे का असा प्रश्न जगाला पडेल. लोकशाहीत गळा घोटण्याचं काम केले जात आहे. सगळ्यात मोठ्या लोकशाहीचे पंख छाटण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहे असा आरोप संजय राऊतांनी केंद्र सरकारवर लावला आहे.